‘वरूणराजा’ बरसतोय! पण कुठे?
By Admin | Updated: August 1, 2016 00:12 IST2016-08-01T00:12:32+5:302016-08-01T00:12:32+5:30
‘मान्सुन येणार’ हा शब्द ऐकुणच दु:ख बाजुला सारून बळीराजा मशागतीच्या कामाला सुरूवात करतो.

‘वरूणराजा’ बरसतोय! पण कुठे?
शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला : सर्वदूर दमदार पावसाची गरज, जिल्ह्यात फक्त २७ टक्केच रोवणी, भारनियमनाचे संकट डोक्यावर
भंडारा : ‘मान्सुन येणार’ हा शब्द ऐकुणच दु:ख बाजुला सारून बळीराजा मशागतीच्या कामाला सुरूवात करतो. नेहमीप्रमाणे उशिरा का असेना पाऊस बसरतोही. पेरणीच्या कामाला प्रारंभ होतो. परंतु पावसाची दगाबाजी कायम होत असल्याने सद्यस्थितीत तरी शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. वरूणराजा बरसतोय पण कुठे, हा प्रश्न बळीराजासमोर आहे. जिथे पाऊस बसरला तिथे आनंद असला तरी जिथे पावसाची हजेरी नसल्याने जिल्ह्यात ‘कुठे खुशी कुठे गम’चा प्रत्यय येत आहे.
भंडारा शहरात आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीविक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.
मागील २४ तासात पावसाने जिल्ह्यातील सातही तालुक्यात कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली असली तरी बळीराजा समाधानी नाही. लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. या पावसाने काही परिसरातील शतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोनशे मीटर परिघात पाऊस बसरतो पण त्यानंतर पावसाचा थांगपत्तानसतो. कुठे कुठे गावात पाऊस तर शेत शिवारात पाण्याचा शिरकाव नाही. काही ठिकाणी स्थिती यापेक्षा विरूद्ध आहे. या विचित्र स्थितीने जिल्ह्यात सरासरी जवळपास २७ टक्के रोवणी झाली आहे. मोहाडी, लाखनी, लाखांदुर, साकोली, तुमसर तालुक्तातही पेरणीची कामे आटोपली असली तरी पावसाअभावी रोणवी खोळंबली आहे.
लाखांदूर/दिघोरी : लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. एकट्या दिघोरी परिसरात फक्त ३५ टक्के रोवणी झाली आहे. येथ कल शनिवारी पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली.
पवनी/भुयार : तज्ञांनी यावर्षी भरपूर पावसाची भविष्यवाणी वर्तविली होती. महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र मागील आठ पंधरवाड्यापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर मधील भात पिकाची रोवणी खोळंबली असून शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. दरम्यान काल शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने याचा फटका भाजी बाजाराला बसला. जुलैच्या सुरूवातीत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली मात्र एक आठवड्यानंतर अचानक पावसाने दडी मारली तसाही या परिसरात पाऊन असमाधानकारक राहील आहे. बहुतांश भात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्याचा भात पिकाच्या रोवणीवर जास्तच बसला आहे.
सुरूवातीला बरसलेल्या दमदार पावसामुळे हंंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांनी शेतीची कामे आटोपून भात पिकाचे पऱ्हे टाकले. कसा शेतीचा पुढील हंगाम केला मात्र पाऊन अचानक दिसेनासा झाला त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था असली तरी विद्युत पुरवठा वेळोवेळी मिळत नाही.
रीमझिम पाऊस काही दिवस चालल्याने रोवणीला कशीबसी सुरूवात झाली. काही शेतकऱ्यांनी उशिरा पऱ्हे टाकल्याने सडण्याच्या भितीने साचलेले पाणी बाहेर काढावे लागले. त्यामुळे दमदार पाऊस शेतकऱ्याच्या कामी पडला नाही. तेव्हापासून पाऊस अचानक गायब आहे. निलज आमगाव परिसरात २५ टक्के रोवणी झाली असली तरी भुयार परिसरात ५० टक्के रोवणी खोळंबली आहे. काही शेतकरी दुरवरून, पाणी शेतात आणून रोवणी करीत आहे.
मोहाडी : तालुक्यात पावसाची हजेरी अजुनपर्यंत लागलेली नाही. ढग जमतात, पण बसरत नाही, अश्ी स्थिती आहे. परिणामी शेतकरी चितेंच्या गर्तेत सापडला आहे.
लाखनी/पालांदूर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका थेट बळीराजाला भोगावा लागत आहे. २८ टक्केच शेती सिंचित क्षेत्रात असून ७२ टक्के आजही निसर्गाच्या आश्रीत आहे. मागील १० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला होता. काल सायंकाळच्या सुमारास आठवडी बाजार जोमात असताना वरुणराजा मेहरबान झाला. सरीवर सरी कोसळत ८०-९० मिनिटात समाधानकारक पाऊस झाला. त्याची ७६.२ मि.मी. नोंद करण्यात आली. यामुळे खोळंबलेली रोवणी सुरू झाली आहे.
रोवणी झालेल्या शेतात जमीनींना पाण्याअभावी भेगा पडून धान पिवळे पडले.
काल बरसलेल्या पावसाने खंडीत पडलेली रोवणी पुन्हा आजपासून पुर्ववत सुरु झाली. यासंदर्भात मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंज म्हणाले, ५ हजार ५१४ हेक्टर धान क्षेत्रापैकी ३ हजार ३२ हेक्टरवर रोवणी झालेली आहे. आवत्या १ हजार ५० हेक्टरवर तर २६१ हेक्टरवर अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी रोवणी ५५ टक्केच आटोपली आहे.
(लोकमत न्युज नेटवर्क)
लाखनी तालुक्यात अतिवृष्टी
जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. मागील २४ तासात भंडारा तालुक्यात ९ मिमी, मोहाडी निरंक, तुमसर निरंक, पवनी ५९.८, साकोली १७.४, लाखांदूर १९.२ तर लाखनी येथे ८४.८ मिमी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली. सध्यास्थितीत ३१ जुलैपर्यंत बरसणाऱ्या पावसाची सरासरी ८४ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही सरासरी थोडी अधिक आहे. मात्र वरुणराजाची कृपादृष्टी एकाच परिसरात जास्त प्रमाणात असल्याने दुसरीकडे दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे. अशा स्थितीत बळीराजावर आर्थिक संकट बळावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सध्या स्थितीत सर्वदूर पावसाची गरज आहे.