ग्रीन फ्रेंड्सने राबविले विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:33+5:302021-04-01T04:35:33+5:30
लाखनी : ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब लाखनीतर्फे जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन, जागतिक जल दिन, तसेच जागतिक हवामान ...

ग्रीन फ्रेंड्सने राबविले विविध उपक्रम
लाखनी : ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब लाखनीतर्फे जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन, जागतिक जल दिन, तसेच जागतिक हवामान दिनाबद्दल जागृती करण्याकरिता विविध उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमाकरिता अखिल भारतीय अंनिस शाखा लाखनी, नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी जागतिक चिमणी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. चिमणी तसेच इतर पक्ष्यांचा घरादारातील, अंगणातील अधिवास संपलेला असल्याने त्यांचे जीवनचक्र संकटात सापडले आहे, त्याकरिता पक्षीघरटे व पक्षीपाणपोई कसे बनवावे याचे मार्गदर्शन यावेळी केले.
जागतिक वन दिनानिमित्त लाखनी बसस्थानकावर ग्रीन फ्रेंड्सचे ज्येष्ठ कार्यकर्ते सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकरराव कालेजवार, मारोतराव कावळे, पंकज भिवगडे, श्रीधर कालेजवार, ग्रीन फ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य यांच्या, तसेच निसर्गमित्र स्व. शुभम बघेल यांच्या जन्मदिवसानिमित्त स्मृती वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी पक्षी चिमणी पाखरे यांच्या अधिवासाला उपयुक्त अशी वृक्षलागवड लाखनी बसस्थानक, सावरी तलाव व सावरी स्मशानभूमीत ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबतर्फे करण्यात आले. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने ग्रीन फ्रेंड्सच्या सदस्य विद्यार्थ्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व समजावून देत त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ग्रीन फ्रेंड्सच्या सदस्यांनी टाकाऊ घटकापासून तयार केलेले पक्षीघरटे व पक्षी जलपात्राचे प्रदर्शन करण्यात आले, तसेच महिला दिन व वनदिनाचे औचित्य साधत अनेक महिलांना वृक्षरोपेसुद्धा वाटप करण्यात आली. यात प्रतिमा रामटेके, संगीता निर्वाण, पल्लवी निर्वाण, छाया रामटेके, मनीषा भांडारकर, ज्योती वैद्य, पल्लवी वैद्य, ऋतुजा वंजारी, उषा वंजारी, शालू वंजारी, आयुषी गायधने, निशा बडवाईक, पुष्पा भुरे, लक्ष्मी गिर्हेपुंजे, पूजा रोडे, योगिता रोडे, सुमन आगलावे, जयश्री व आरू आगलावे, अर्चना गायधने, सुमित्रा गायधने, लक्ष्मी आकरे इत्यादी ५० पेक्षा जास्त महिलांना जागतिक वन दिन व महिला दिनाचे औचित्य साधत वृक्षरोपे देण्यात आली.
वाढत्या तापमानवाढीमुळे हवामान बदलाचे धोके जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने सर्वांना समजावून देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अशोक वैद्य, गजानन गभने यांनी केले. आभार योगेश वंजारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी जेएमसीचे अजयप्रताप सिंह, अशोका बिल्डकॉनचे मुख्य अभियंता नितेश नगरकर यांच्यासह छविल रामटेके, प्रज्वल भांडारकर, अमर रामटेके, दीप रामटेके या ग्रीन फ्रेंड्सच्या विद्यार्थ्यांनी, तसेच लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक बी. एन. डहाके, योगेश बैस, पंकज भिवगडे, सलाम बेग, आरिफ बेग, पवन दळवी यांनी सहकार्य केले.