किटाडीलगतच्या जंगलात लागला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:03+5:302021-04-02T04:37:03+5:30
मुखरू बागडे पालांदूर: लाखनी तालुक्यातील किटाळीलगतच्या जंगलात अचानक वणवा लागल्याने सुमारे ८० हेक्टर परिसरातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तीन ...

किटाडीलगतच्या जंगलात लागला वणवा
मुखरू बागडे
पालांदूर: लाखनी तालुक्यातील किटाळीलगतच्या जंगलात अचानक वणवा लागल्याने सुमारे ८० हेक्टर परिसरातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तीन दिवसांपूर्वी लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात बुधवारी रात्री वन अधिकारी, कर्मचारी, वनमजुरांना यश आले. हा वणवा नैसर्गिक की मानवनिर्मित, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
लाखनी तालुक्यात किटाळी परिसरात वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यात किटाडी, रेंगोळा, पुरखाबोडी, डोंगरगाव, मांगली आदी गावाशेजारी वनसंपदा आहे. यात वन्य प्राणीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. तीन दिवसांपूर्वी या परिसरात आग लागल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती वन विभागाला देण्यात आली. वणवा विझविण्यासाठी १५ कर्मचारी, मजुरांच्या सहकार्याने वणव्यावर नियंत्रण मिळविणे सुरू झाले. ब्लोअर मशीनच्या साहाय्याने आग विझविणे सुरू झाले. तब्बल तीन दिवसानंतर बुधवारी रात्री ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. राखीव वनातील सुमारे ३० हेक्टर क्षेत्रात आग लागल्याची माहिती अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांनी दिली. जंगलाशेजारील गावातील नागरिकांनी वनसंपदेची काळजी घेत वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर पुरकाबोडीचे वनपाल दिगंबर ठोंबरे म्हणाले, या आगीत नेमके किती हेक्टरवर नुकसान झाले, याची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर नुकसानीचा आकडा कळेल असे त्यांनी सांगितले.
बॉक्स
वणवा कृत्रिम की मानवनिर्मित?
अलीकडे जंगलात आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आग लागू नये यासाठी वन विभागाने फायर लाईनसह विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही आगीच्या घटना घडत आहेत. जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी आग लावण्याचे प्रकार नवीन नाही. तसेच अनावधानाने ही आगी लागतात. मात्र किटाडीलगतच्या जंगलात लागलेली आग मानवनिर्मित असल्याची चर्चा आहे. वन विभागाने या आगीच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.