विद्यार्थी व शिक्षकांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:22+5:302021-03-07T04:32:22+5:30
भंडारा - कोविड -१९ वर प्रतिबंध घालण्यासाठी प्राधान्याने विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांना तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा ...

विद्यार्थी व शिक्षकांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करा
भंडारा - कोविड -१९ वर प्रतिबंध घालण्यासाठी प्राधान्याने विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांना तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने शासनाकडे केली आहे. यासंदर्भात एक निवदेन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
नवीन वर्षातही कोरोना जिल्ह्यात पसरत आहे. जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. अजूनही शहर व खेड्यात कोरोनाची धास्ती अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत मानसिकदृष्ट्या विद्यार्थी व शिक्षक सुदृढ रहावा तसेच मनात असणारी भीती राहू नये यासाठी प्राधान्याने विद्यार्थी व सर्व शिक्षकांना मोफत लसीकरण करावे. पुढील महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. भीतीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे .या संदर्भाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण राज्यमंत्री तसेच प्रशासनातील आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालकांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे.
बॉक्स
दहावी, बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्या
आतापासून उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाळा तापदायक राहणार आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षेच्या वेळा सकाळी ९ ते १२ अशी करण्यात यावी. तसेच सुरू असणारे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्यासंबंधी सूचना तात्काळ देण्यात याव्यात, परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात यावी, विद्यार्थ्यांना ५० टक्केअंतर्गत गुण देण्यात यावेत. शाळा पातळीवरून गुण देण्याची नियोजन शिक्षण विभागाला करण्याचे निर्देश शासनाने तातडीने द्यावे, तसेच सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. परीक्षा व त्याचे मूल्यमापन कसे करावे, या गोंधळात शाळांमधील शिक्षक सापडले आहेत. लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन याबाबत स्पष्टता करण्यात यावी. अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव राजू बांते, उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, रेखा भेंडारकर, सहसचिव अर्चना बावणे, कोषाध्यक्ष राधेश्याम धोटे, विष्णुदास जगनाडे, गोपाल बुरडे, सुनीता तोडकर, कुंदा गोडबोले, रवी मेश्राम, वीपीनचंद्र रायपूरकर, अतुल बारई, राजू भोयर, सुनील गोल्लर, अनमोल देशपांडे, जी. एन. टीचकुले, प्रदीप मुटकुरे, दामोदर काळे आदींनी केली आहे.