प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
By Admin | Updated: November 11, 2014 22:36 IST2014-11-11T22:36:42+5:302014-11-11T22:36:42+5:30
पर्यावरण संतुलनाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकचा कमीतकमी वापर झाला पाहिजे. हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे,

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
भंडारा : पर्यावरण संतुलनाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकचा कमीतकमी वापर झाला पाहिजे. हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे, मात्र महाराष्ट्रात नाही.
हिमाचल प्रदेशातील डलहौसी, कुलू-मनाली, सिमला या शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदाच्या पिशव्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे राजस्थानातील उदयपूर, जोधपूर या शहरातही पेपर बॅग वापरल्या जातात.
भंडारा जिल्ह्यात परवानाधारक कारखान्यांची संख्या सात
प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नागपूर जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांची निमिर्ती करणाऱ्या फक्त दहा कारखान्यांनाच परवानगी दिली आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. प्लास्टिकचे रिसायकलिंग करणाऱ्या कारखान्यांना महामंडळ प्रोत्साहन देत आहे. असे कारखाने जास्तीतजास्त सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यात रिसायकलिंग करणारे कारखाने नाहीत. तशी दखलही घेण्यात आलेली नाही. मोठ्या शहरात ग्रॅन्युअल्स तयार केल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या तयार केल्या जातात. दुर्दैवाने हे ग्रॅन्युअल्स अप्रमाणित जाडीच्या पिशव्या तयार करणारे छोटे युनिटच खरेदी करताना दिसत आहेत.
कारवाई मात्र तरीही विक्री
४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्यांवर आरोग्य विभागातर्फे कारवाई केली जाते. आरोग्य विभागाचे पथक दर आठवड्याला बाजारपेठेत पाहणी करते. माहिती मिळताच अशा कारखान्यांवरही धाडी घातल्या जातात.
मात्र, त्यानंतरही काही विक्रेते कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करतात. जनजागृती करूनही याकडे विक्रेत्यांचे दुर्लक्ष होते. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढतच चालला आहे. त्यामुळे त्याचे विविध विपरित परिणाम दिसू लागले आहेत. याबाबत सामाजिक संघटनांकडून जनजागृती होत असली तरी काही काळापुरताच त्याचा परिणाम दिसून येतो, हेही वास्तव आहे.
प्लास्टिकमुळे कागदी व कापडी पिशव्यांचे मार्केट अवघे १० टक्क्यांवर आले असले तरी, बाजारातील मागणीप्रमाणे कागदी पिशव्यांचे उत्पादन करणे सहज शक्य असल्याचा दावा कागदी पिशव्यांच्या उत्पादकांनी केला आहे. प्लास्टिक पिशव्यांवर सरसकट बंदी आणली तरच कागदी पिशव्यांची मागणी वाढणार आहे. मागणी नसल्याने कागदी पिशव्या बनविणारे उत्पादकही कमी आहेत. आता कागदी पिशव्या यंत्रावरही झटपट तयार करता येतात. त्यामुळे बाजारातील मागणीप्रमाणे उत्पादन करणे सहज शक्य असल्याचा विश्वास कागदी पिशव्यांच्या व्यवसायातील माहितीदारांनी व्यक्त केला. मात्र, याविषयीची अनास्थाच दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)