शालेय पोषण आहारात कीड लागलेल्या धान्याचा वापर
By Admin | Updated: July 23, 2016 01:09 IST2016-07-23T01:09:48+5:302016-07-23T01:09:48+5:30
तालुक्यातील ढोरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात कीड लागलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांना आहार देणे सुरु आहे.

शालेय पोषण आहारात कीड लागलेल्या धान्याचा वापर
ढोरवाडा येथील प्रकार : तांदूळ व वटाण्यांचा समावेश, शाळेला कुलूप ठोकणार
तुमसर : तालुक्यातील ढोरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात कीड लागलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांना आहार देणे सुरु आहे. पोषण आहाराची चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांना धान्य कमी आढळले. या प्रकरणात १८०० रुपयांचा दंड मुख्याध्यापिकेवर ठोठावण्यात आला. सोमवारपर्यंत मुख्याध्यापिकेचे स्थानांतरण न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पं.स. सदस्य तथा ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांनी दिला आहे.
आमचा गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय ढोरवाडा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. या बैठकीत पं.स. सदस्या मंगला कनपटे, सरपंच ग्यानीराम बुध्दे, उपसरपंच आसाराम खंगार, ग्रा. पं. सदस्य दिलीप बोंदरेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील पोषण आहार संदर्भात निकृष्ठ आहार व गुरुपौर्णिमेला शाळेत शालेय पोषणआहार शिजविला नाही. परंतु शालेय दस्तऐवजात नोंद प्रकरणी चौकशीकरिता शालेय पोषण आहार योजनेचे अधीक्षक जयप्रकाश जिभकाटे गुरुवारी आले होते. यात किड लागलले वटाणे तथा तांदळाच्या गोल गाठी झालेल्या आढळल्या. सुमारे २५ किलोग्रॅम वटाणांचा त्यात समावेश होता. शाळेत पुरेसे धान्य उपलब्ध नव्हते.
भाजीत आंब्याच्या वाळलेल्या फोडी घालण्यात येतात अशा तक्रारी पदाधिकारी, पालकांनी केल्या. खाण्यायोग्य नसलेल्या वटाण्याचे बेसन करुन विद्यार्थ्यांना देण्यात येते. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रकरणाची खंडविकास अधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली, परंतु काहीच कारवाई झाली नाही. मुख्याध्यापिका सुधा पटले ह्या नागपूरवरुन ये-जा करतात. पदाधिकाऱ्यांशी असभ्य बोलतात अशी तक्रार करण्यात आली. या शाळेत १ ते ७ पर्यंत १०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
पंचायत समितीचे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष याकरिता कारणीभूत आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदनावर पंचायत समिती सदस्या मंगला कनपटे, शाळा समिती अध्यक्ष नानाजी बुधे, उपाध्यक्ष रत्नमाला बिल्लोटे, सदस्य रुपाली भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण बुध्दे, तारासन गाढवे, अनिता बुध्दे, नलु खंगार सह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)