मराठीचा वापर करून ‘मायबोली’ जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 00:32 IST2017-03-01T00:32:01+5:302017-03-01T00:32:01+5:30
आधुनिकतेत आता प्रत्येक कार्यालयात इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

मराठीचा वापर करून ‘मायबोली’ जपा
चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : भंडारा बसस्थानकात मराठी भाषा गौरव दिन
भंडारा : आधुनिकतेत आता प्रत्येक कार्यालयात इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ही चांगली बाब असली तरी प्रत्येक मराठी माणसाने इंग्रजी सोबतच मराठी भाषाही जपली पाहिजे. आवश्यक तिथेच प्रत्येकाने इंग्रजीचा वापर करावा. मराठीचा वापर प्रत्येक ठिकाणी करून ‘मायबोली’ जपावी, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन भंडारा मध्यवर्ती बसस्थानकावर करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय नियंत्रक नागुलवार, जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आरती देशपांडे, कामगार अधिकारी गोन्नाडे, राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा आगार व्यवस्थापक संजय डफरे, वाहतूक निरीक्षक बसस्थानक प्रमुख सुनिल जिभकाटे, विभागीय सांख्यीकी अधिकारी आदमने, सहवाहतूक निरीक्षक आर.जे. गडेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मराठी साहित्याचा मापदंड जपण्यासाठी राज्यभर मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश राज्य मार्ग परिवह न महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारला भंडारा येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेची प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करून आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, व्यवहारातून मराठी भाषा वापरली पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा आगार व्यवस्थापक संजय डफरे यांनी केले. संचालन व आभार बसस्थानक प्रमुख सुनिल जिभकाटे यांनी केले. कार्यक्रमाला लेखापाल वाघाये, अनिल पशिने, अल्पेश पशिने, आगारातील चालक व वाहक यांच्यासह बसस्थानकातील कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. दरम्यान मराठी भाषादिनाचे औचित्य साधून बसस्थानकात भव्य रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीतून मराठी भाषेचे महत्व सांगण्यात आले. ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. (शहर प्रतिनिधी)