६५ वर्षांच्या क्रीडा परंपरेत बदल, ३० शिक्षकांनी घेतले प्रशिक्षण नितेश किरणापुरे लवारी शालेय क्रीडा स्पर्धेत नियमावली असतानाही त्याचा उपयोग होत नाही. जिल्ह्यात प्रथमच साकोली तालुक्यातील लवारी येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाच्या नियमांनी स्पर्धा घेण्यात आल्या. यात पिवळा, हिरवा व लाल रंगाच्या कार्डचा वापर करण्यात आला. स्पर्धेसाठी ३० शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. या नियमांमुळे तीन संघांवर पराभव होण्याची नामुष्की ओढवली. मागील ६५ वर्षाच्या क्रीडा परंपरेत यावर्षी हा नवा पायंडा घालण्यात आला आहे.स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने जिल्हा परिषद शाळांची क्रीडा स्पर्धा घेण्यात येते. १९४० मध्ये कमाने, पनके व क्षीरसागर या शिक्षकांनी हे मंडळ स्थापन केले होते. भंडारा - गोंदिया या दोन जिल्ह्यात मागील ६५ वर्षांपासून हे मंडळ स्पर्धा घेत आहे. या मंडळाने प्रत्येक खेळाडूला खेळाच्या प्राथमिक स्तरावरून आंतरराष्ट्रीय नियमांची माहिती व्हावी, यासाठी नियम बनविले आहेत. मात्र, या नियमांना बाजुला सारत क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी जातो तेव्हा तो नियमांमुळे तग धरू शकत नाही. ही बाब हेरून स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाने केंद्रप्रमुख के. टी. हरडे यांनी श्रमकौशल्य विकास उपक्रमातून ६५ वर्षाच्या परंपरेत बदल घडवून आणत यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या नियमांचा प्रथमच प्रयोग करण्याचे ठरविले. यादृष्टिने त्यांनी साकोली केंद्रातील ३० शिक्षकांना आंतरराष्ट्रीय नियमांचे प्रशिक्षण दिले. याची अंमलबजावणी लवारी येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत करून यशस्वीरित्या स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे गुणदानही आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या नियमानी प्रशिक्षित शिक्षकांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा नैपुन्य असते. परंतु, त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे नियम माहित नसल्यामुळे त्यांचा स्पर्धेत टिकाव लागत नाही. या नियमांची त्यांना माहिती व्हावी यासाठी जिल्ह्यात लवारी येथे प्रथमच या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. याचा स्पर्धकांना निश्चितच लाभ होईल. - रामलाल डोंगरवार, कार्यवाह, स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ, साकोली.
आंतरराष्ट्रीय नियमांचा शालेय क्रीडा स्पर्धेत वापर
By admin | Updated: January 12, 2016 00:36 IST