नागरी उपजीविका अभियान कौशल्य प्रशिक्षण
By Admin | Updated: July 30, 2015 00:39 IST2015-07-30T00:39:45+5:302015-07-30T00:39:45+5:30
केंद्र व राज्य शासन राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ ...

नागरी उपजीविका अभियान कौशल्य प्रशिक्षण
मुख्याधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन : शहर अभियान व्यवस्थापन कक्ष स्थापन प्रशिक्षण
भंडारा : केंद्र व राज्य शासन राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी या संस्थांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत भंडारा नगर परिषदेत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान प्रशिक्षण केंद्रात बेरोजगारांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रशिक्षणाचा लाभ ४५० महिला व पुरूषांनी घेतला असून यावेळी मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण पडोळे, जिल्हा अग्रणी बँकेचे शाखा प्रबंधक संजय पाठक, बँक आॅफ महाराष्ट्रचे चवरे उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात नर्सिंग असिंस्टट, टॅली, ब्युटी कल्चरल, इलेक्ट्रिशियन, मोबाईल रिपेरिंग, सिक्युरिटी गार्ड, आॅटोमोबाईल रिपेरिंग, वेल्डिंग, रिटेल मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायांची माहिती देण्यात आली. तसेच स्वयंरोजगाराकरिता वैयक्तिक कर्ज, बचत गटाचे कर्ज, बँकेची भूमिका तसेच शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षणात १२१ प्रशिक्षणार्थ्यांनी विविध कौशल्य प्रशिक्षणाकरीता नाव नोंदणी केली. स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक व्यावसायाकरिता जिल्हा अग्रणी बँकेचे संजय पाठक यांनी लाभार्थ्यांची मुलाखत घेऊन कर्ज प्रक्रियेविषयी माहिती देऊन बँकेची भूमिका विषद केली. यामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता कमाल दोन लाख आणि बचत गटाकरिता कमाल १० लाखपर्यंत कर्ज मर्यादा आहे. नियमित परतफेड केल्यास व्याजावर अनुदान दिले जाते, अशी माहिती दिली. यावेळी युको बँकेचे प्रधान, स्टेट बँक आॅफ इंडियाचे केसरी, समुदाय संघटक उषा लांजेवार उपस्थित होते. भंडारा नगर परिषद क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील नागरिकांनी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियांनाचे मार्गदर्शन व माहितीकरिता शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, नगर परिषद येथे संपर्क साधता येईल, असे आवाहन मुख्याधिकारी रवींद्र देवतळे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)