असंघटित कामगारांचा संप

By Admin | Updated: May 13, 2014 23:20 IST2014-05-13T23:20:55+5:302014-05-13T23:20:55+5:30

कंत्राटी पद्धतीवर काम करून घेताना कंत्राटदाराकडून होणारी पिळवणुक आणि आर्थिक शोषणाच्या विरोधात असंघटित कामगारांनी पुन्हा संप पुकारला. सोमवार रोजी सुमारे ४00 ते ५00 ...

Unorganized workers' association | असंघटित कामगारांचा संप

असंघटित कामगारांचा संप

जवाहरनगर : कंत्राटी पद्धतीवर काम करून घेताना कंत्राटदाराकडून होणारी पिळवणुक आणि आर्थिक शोषणाच्या विरोधात असंघटित कामगारांनी पुन्हा संप पुकारला. सोमवार रोजी सुमारे ४00 ते ५00 कामगारांनी एकत्र येत कंत्राटदार तसेच आयुध निर्माणी व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करीत एकजुटीचे प्रदर्शन घडविले. मागील सहा महिन्यात कामगारांनी दुसर्‍यांदा संप करीत असले तरी व्यवस्थापन व कंत्राटदारांकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही.

दारू गोळ्याची निर्मिती केल्या जाणार्‍या आयुध निर्माणीमधील नियमित कामगार सेवानवृत्त झाले असले तरी रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत तर परिणामी कार्यरत कामगारांवर कामाचा ताण वाढत असल्याने अनेक कामे कंत्राटी पद्धतीवर केली जात आहे. निर्माणी परिसरातील गवत कापणी, उद्यान निगरानी, स्वच्छता, चालक सेवा, डागडुजी व इतर अनेक प्रकारच्या कामांचा त्यात समावेश आहे.

शासकीय नियमानुसार रोजंदारी कर्मचार्‍यांना ३२६ रूपये रोजी देणे आवश्यक आहे. या कंपन्यांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचे भारतीय स्टेट बँक, ग्राहक सेवा केंद्र कोंढी येथे सीएसपी १0३७१३२४ क्रमांकाचे खाते उघडण्यात आले असून कंत्राटदारातर्फे महिन्याचे वेतन जमा केले जाते. मात्र या केंद्रांमार्फत कामगारांना पूर्ण वेतन दिले जात नसल्याचा आरोप आहे.

कंत्राटी कामगारांनी अत्यावश्यक कामासाठी आकस्मिक रजा घेतल्यास त्या दिवसाची मजूर दिली जात नाही. शिवाय सुट्टीची शिक्षा म्हणून ३0 रूपयांपासून २५0 रूपयांपर्यंंत कपात केली जाते. कामाच्या नियमित तासापेक्षा अधिक काळ कामगारांना राबवून घेतले जाते. याबाबत विचारले असता कंत्राटदाराकडून धमकी दिली जाते. परिणामी कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत तक्रार करूनही आयुधी निर्माणी व्यवस्थापन कंत्राटदारावर लगाम कसण्यात अपयशी ठरले आहे. रोजंदारी नियमानुसार वेतन दिले जावे, ईपीएफ कपातीची पावती व कोड नंबर दिला जावा, दंडाच्या स्वरूपात कंत्राटदाराकडून कपात करू नये, सुरक्षा पोशाख रक्कम कपातीचा नियम रद्द करावा आदी अनेक अनेक मागण्यांच्या सर्मथनार्थ शेकडो कर्मचार्‍यांनी सोमवारी सकाळी ७ वाजतापासून बेमुदत संप पुकारला. संपात महिला आणि पुरूष कामगार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. असंघटित कामगार संघटनेचे परमानंद मेश्राम, शरद तठे, महेश मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. या पुर्वी १८ नोव्हेंबर रोजी कामगारांनी असाच संप पुकारला होता. मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Unorganized workers' association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.