संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
By Admin | Updated: August 4, 2014 23:35 IST2014-08-04T23:35:37+5:302014-08-04T23:35:37+5:30
महाआॅनलाईन कंपनीच्या माध्यमातून राज्यात संगणक डाटा आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली. त्यातील भंडारा जिल्ह्यातील ४० संगणक परिचालकांना कामावरून कमी केल्याने

संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
भंडारा : महाआॅनलाईन कंपनीच्या माध्यमातून राज्यात संगणक डाटा आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली. त्यातील भंडारा जिल्ह्यातील ४० संगणक परिचालकांना कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.
महाआॅनलाईन लिमी. च्या पीसी आणि डीसी च्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली होती. या संगणक परिचालकांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची कामे सोईचे व्हावे हा एकमेव उद्देश राज्य शासनाचा होता. तालुकास्तरावर कामाकरिता येत असताना नागरिकांना आर्थिक, मानसिक, शारीरिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला डाटा एंट्री आॅपरेटरची नेमणूक केली. त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांना सर्व प्रकारचे कागदपत्रे देण्यात येत होती. जिल्ह्यातील सर्व डाटा एंट्री आॅपरेटरची कामे सुरळीत सुरु असताना ४० संगणक परिचालकांच्या पीआयएस आयडी अचानकपणे बंद करण्यात आली. याबाबत महाआॅनलाईन लिमीटेडच्या पीसी आणि डीसी डाटा एंट्री आॅपरेटरनी संपर्क साधला असता त्यांना कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर संगणक परिचालकांना कमी करताना महाआॅनलाईनने परिचालकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांना कमी केल्याचे सांगण्यात आले. याबद्दल डाटा एंट्री आॅपरेटरनी त्यांच्या न्याय हक्कासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यात भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यातील शेकडो डाटा एंट्री आॅपरेटर सहभागी झाले होते. या आॅपरेटरांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, समाज कल्याण सभापती अरविंद भालाधरे, माजी सभापती चरण वाघमारे, आरोग्य सभापती संजय गाढवे, प्रशांत खोब्रागडे यांना निवेदन देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत डाटा एंट्री आॅपरेटरच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी संगणक परिचालकांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले. महाआॅनलाईनच्या समन्वयकांनी या ४० संगणक परिचालकांच्या व्यतिरिक्त अन्य परिचालकांचे आयडी बंद केले नसल्याचे उघडकीस आल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. संगणक परिचालकांना त्वरीत कामावर रूजू करावे अन्यथा महाआॅनलाईनला जिल्ह्यातील काम बंद करण्याचे आदेश द्यावे असे जिल्हा परिषद अध्यक्षांनी संबंधित यंत्रणेच्या वरिष्ठांना सुचविले आहे. (शहर प्रतिनिधी)