अनियंत्रित ट्रकची कार-दुचाकीसह घराला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST2021-04-04T04:36:56+5:302021-04-04T04:36:56+5:30
तुमसर : लोखंडी सळाखा भरून असलेल्या अनियंत्रित ट्रकने कार, दोन दुचाकी, बैलगाडी आणि एका घराला धडक देण्याची घटना तुमसर ...

अनियंत्रित ट्रकची कार-दुचाकीसह घराला धडक
तुमसर : लोखंडी सळाखा भरून असलेल्या अनियंत्रित ट्रकने कार, दोन दुचाकी, बैलगाडी आणि एका घराला धडक देण्याची घटना तुमसर येथे शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या थरारानंतर चालक ट्रकसह पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला मध्यप्रदेशातून जेरबंद केले.
भंडारा रोडवरून एक ट्रक सुसाट वेगाने तुमसर शहरात रात्री ९ वाजता प्रवेश करीत होता. शहरात प्रवेश करताच त्याने दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर ट्रकने सराफा लाइनमध्ये एका कारला आणि रस्त्यालगतच्या घराला धडक दिली. हा थरार सुरू असताना नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सुसाट वेगाने पसार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला असता मध्यप्रदेशातील भोरगड, खैरलांजीदरम्यान चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांनी दिली. प्रकाश सिंह रहाट (३२), रा. हिराकुंड काॅलनी, रायपूर असे चालकाचे नाव आहे. तुमसर सोबतच त्याने सिहोरा येथे एका बैलगाडीला धडक दिली, तर खैरलांजी परिसरातही काही वाहनांना धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.