बेशिस्त बाजार!
By Admin | Updated: June 8, 2015 01:01 IST2015-06-08T01:01:14+5:302015-06-08T01:01:14+5:30
प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाखांवर गेली आहे.

बेशिस्त बाजार!
प्रशांत देसाई / देवानंद नंदेश्वर भंडारा
प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाखांवर गेली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच चहुबाजूंनी विस्तार होत असल्याने लोकांची गरज म्हणून शहराच्या विविध भागात नवेनवे अनधिकृत आठवडी व दैनंदिन बाजार भरतात. यामुळे नागरिकांची सुविधा होत असली तरी, रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अशा बेशिस्त बाजारांना शिस्त कोण लावणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांमुळे वाहतुकीला अडथला निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. बाजार संपल्यानंतर सफाई होत नसल्याने बहुतांश ठिकाणी सडका भाजीपाला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पडून राहतो. मटण विक्रेते घाण उघड्यावर फेकून देतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. फेकलेला भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांची गर्दी जमते. सोयीसाठी भरविल्या जाणाऱ्या या बाजारांमुळे नागरिकांची गैरसोय होते. नगरपालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. नागरिकांची बाजाराची गरज व अनधिकृ त बाजारांमुळे होणारी गैरसोय विचारात घेता नगरपालिकेने संबंधित रस्त्यांवरील अनाधिकृत बाजार मैदानांमध्ये स्थानांतरित करण्याची गरज आहे.
शहरात अधिकृत एकच आठवडी बाजार व सहा ठिकाणी दैनिक बाजार आहेत. हे सर्व बाजार भरत असले तरी ते अनधिकृत असल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील दळणवळण व्यवस्थेवर परिणाम पडत आहे.