नदी पात्रात अनधिकृत रेती घाट
By Admin | Updated: June 15, 2015 00:27 IST2015-06-15T00:27:46+5:302015-06-15T00:27:46+5:30
आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बावनथडी नदीच्या पात्रात ४ अनधिकृत रोती घाट सुरु आहेत.

नदी पात्रात अनधिकृत रेती घाट
प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ : अधिकारीही संभ्रमात
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बावनथडी नदीच्या पात्रात ४ अनधिकृत रोती घाट सुरु आहेत. रेतीच्या उपसा करण्यासाठी मध्यप्रदेशातील रेती माफियांनी नदीपात्रात मार्गाचे बांधकाम केले आहे. यामुळे रेतीची चोरटी वाहतूक थांबविणार कोण? असा प्रश्न जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे.
जिल्हा भरात रेती घाटाचे लिलाव झाले आहे. जिल्ह्याच्या हद्दीत असणारे नदीचे पात्राचे घाट लिलाव करून प्रशासन मोकळे झाले असले तरी प्रशासकीय यंत्रणा चोरट्या वाहतुकीवर कारवाई करताना चांगलीच चक्रावली आहे. सिहोरा परिसरात बावनथडी तथा वैनगंगा नदी आहे. या नदीवर असणारे तामसवाडी, वारपिंडकेपार रेती घाट लिलाव झाली आहे. यामुळे परिसरात रेतीची चोरटी वाहतूक थांबली आहे. वाहन धारक टेंशन घेत नाही. दंडाची रक्कम अधिक असल्याने रेती घाटावरून रेतीची आयात केली जात आहे. या नद्यांच्या पात्रात रेतीची गुणवत्ता भिन्न प्रकारची असल्याने ग्राहकांच्या सोयीनुसार रेतीचा उपसा करण्यात येत आहे. यामुळे नद्यांच्या पात्रात ‘ड्रामा’ सुरु आहे. बांधकामासह अन्य कार्यात विविध प्रकारची रेती मागविण्यात येत असताना या रेतीची चोरी सुरु झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत आहे. दोन्ही प्रशासनाने घाट लिलाव केला असता सीमांकीत क्षेत्र निर्धारित केली आहे. परंतु सिमांकीत क्षेत्र ओलांडण्यात आली आहे. एक प्रकारे चोरटी वाहतूक सुरु झाल्याचा अनुभव येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेल्यास जिल्ह्याच्या सीमेत पळवाट शोधण्यात येत आहे. यानंतर हद्द संपल्याच्या कारणावरून कर्मचारी माघारी परतत आहे. दोन्ही जिल्हा प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे. यामुळे राजरोषपणे रेतीचा उपसा सुरु आहे.
आंतरराज्यीय सीमेची विभागणी करणाऱ्या बावनथडी नदीच्या पात्रात धक्कादायक वास्तव शोध मोहिमेत निदर्शनास आले आहे. या नदीच्या एका काठावर सिहोरा परिसरातील गावे आहेत. तर दुसऱ्या टोकावर मध्यप्रदेशातील गावे आहेत. जिल्हा प्रशासनाने वारपिंडकेपार घाट लिलावात काढला आहे. या घाटातून रेतीचा उपसा करणारा रस्ता मध्यप्रदेशात जात आहे. दरम्यान याच नदीच्या पात्रात ४ अनधिकृत रेती घाट सुरु करण्यात आली आहे. या रेतीची आयात नाकाडोंगरी परिसर तथा मध्यप्रदेशात केली जात आहे. लांब पल्ल्याचे ठिकाण असल्याने सिहोरा परिसरात या रेतीची आयात केली जात नाही.
मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीत असणाऱ्या पात्राचे घाट लिलाव करण्यात आले नाही. या शिवाय पात्रातील रेतीची गुणवत्ता नाही. यामुळे या राज्यातील वाहनधारक सिहोरा परिसरात असणाऱ्या पात्रात शिरकाव करीत आहे. या वाहनधारकावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतल्यास वाहनासह थेट मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीत पळवाट शोधण्यात येत आहे. यामुळे यंत्रणा चक्रावली आहे. या वाहन धारकावर कुणी कारवाई करू शकत नाही.
असा झाला रस्ता तयार
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बदली सत्र सुरू करण्यात आले आहे. या कालावधीत महसूल विभागाचे बहुतांश कर्मचारी बदलून गेली आहेत. यामुळे नदी पात्रात फेरफटका मारणारे कुणी जबाबदार अधिकारी नसल्याने याच संधीचा फायदा घेण्यात आलेला आहे. या कालावधीत नदी पात्रात दोन्ही सीमांना जोडणारा रस्ता तयार करण्यात आलेला आहे.
संयुक्त चौकी तयार करा
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणावरून अवैध व्यवसायिक वाहतूक करीत आहेत. या मार्गावर तपासणी नाका नाही. या धरणावर महसूल, वनविभाग तथा पोलीस अशी तीन सदस्यीय संयुक्त चौकी तयार करण्याची गरज आहे.