‘आनंद मेळा’चा रेल्वेच्या जागेवर अनधिकृत कब्जा

By Admin | Updated: June 5, 2016 00:22 IST2016-06-05T00:22:16+5:302016-06-05T00:22:16+5:30

खात रोड मार्गावर असलेल्या रेल्वे मैदानावर मागील १५ दिवसांपासून अनधिकृतरीत्या आनंद मेला सुरू आहे.

Unauthorized occupation of 'Ananda Mela' on railway tracks | ‘आनंद मेळा’चा रेल्वेच्या जागेवर अनधिकृत कब्जा

‘आनंद मेळा’चा रेल्वेच्या जागेवर अनधिकृत कब्जा

मेळा बंद करण्याची रिपाइंची मागणी : भंडारेकरांच्या जीवाशी खेळ
भंडारा : खात रोड मार्गावर असलेल्या रेल्वे मैदानावर मागील १५ दिवसांपासून अनधिकृतरीत्या आनंद मेला सुरू आहे. हा आनंद मेळा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे जिल्हा कार्याध्यक्ष आसित बागडे यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.
खात रोड मार्गावर रेल्वे विभागाच्या खुल्या जागेवर मागील १५ दिवसांपासून विनापरवाना आनंद मेला सुरु आहे. सदर आनंद मेळ्यातील झुले व यंत्रांची तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून रितसर तपासणी केलेली नसून परवानगी मागताना सदर यंत्र व झुल्यांची तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात आलेले नाही. आनंद मेळ्यातील कर्मचारी व प्रेक्षकांचा विमासुद्धा काढण्यात आलेला नाही. यासोबत हमीपत्र सुद्धा जोडण्यात आलेले नाही. या सगळ्या त्रुटी लक्षात आल्याने पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सदर आनंद मेळ्याला परवानगी देण्यात येऊ नये, असा स्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविलेला आहे. विविध शासकीय कार्यालयाकडून लागणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्रांची जोडणीसुद्धा आनंद मेळाच्या संचालकांनी केलेली नाही.
या कारणांमुळे आनंद मेळयाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. असे असतानासुद्धा सदर जागेवर अनधिकृतरित्या आनंद मेळा सुरू आहे. परिणामी शासनाचा हजारो रूपयांचा महसूल बुडत आहे.
मागीलवर्षी याच आनंद मेळ्यातील ब्रेक डान्स झुल्यामधून कांचन भास्कर ही महिला पडली होती. त्यात गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना या आनंद मेळ्याच्या संचालकाकडून कोणत्याही प्रकारची भरपाई किंवा मदत देण्यात आलेली नाही. कालांतराने त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. यावर्षीही नियमांचे उल्लंघन करीत मागील १५ दिवसांपासून भंडारा शहरवासियांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असे असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
एरव्ही सार्वजनिक सभा व कार्यक्रमांना परवानगी नसताना व विशेष कार्यक्रमांकरिता कार्यक्रमाची परवानगी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून दिली असताना रात्री १० वाजताच कार्यक्रम बंद पाडत कारवाईची पोलीस प्रशासनाकडून तत्परता दाखविली जाते. परंतु अनधिकृतरित्या विना परवानगीने भंडारा शहराच्या मध्यभागी असा अनधिकृतपणे सुरु असलेला आनंद मेळा बंद पाडण्यात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे भंडाराकरांच्या जीवनाशी खेळणारा आनंद मेळा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणीही रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष आसित बागडे यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized occupation of 'Ananda Mela' on railway tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.