दुचाकी आढळली, मात्र अड्याळच्या बेपत्ता तरुणाचा थांगपत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:48+5:302021-03-06T04:33:48+5:30
सचिन अशोक श्रृंगारपवार (३७) हा १ मार्च रोजी घरातून आपली दुचाकी घेऊन गेला होता. परंतु तो घरी परतला नाही. ...

दुचाकी आढळली, मात्र अड्याळच्या बेपत्ता तरुणाचा थांगपत्ता नाही
सचिन अशोक श्रृंगारपवार (३७) हा १ मार्च रोजी घरातून आपली दुचाकी घेऊन गेला होता. परंतु तो घरी परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद येत होता. शेवटी अड्याळ पोलीस ठाण्यात सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शोध सुरू केला. परंतु थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास लाखनी तालुक्यातील गडेगाव बसथांब्यावर दुचाकी आढळून आली. ही माहिती ग्रामस्थांनी अड्याळ पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करत दुचाकी ताब्यात घेतली. ज्या ठिकाणी ही दुचाकी आढळली त्याच्या बाजूला चहाची टपरी आहे. माहितीनुसार ही दुचाकी सोमवार दुपारपासून या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे दुचाकी हॅन्डल लॉक केलेल्या स्थितीत असून, ती कुणी ठेवली. हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
दुचाकी आढळली असली तरी सचिनचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अड्याळपासून तब्बल २४ किलोमीटर अंतरावर त्याची दुचाकी आढळून आली. ही दुचाकी सचिनने ठेवली, की आणखी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सचिन हा भंडारा येथील एका फायनान्स कंपनीत काम करीत होता. त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान अड्याळ पोलिसांपुढे आहे.