ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पोस्टमन तरूणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:55 IST2019-01-21T22:55:04+5:302019-01-21T22:55:17+5:30
लग्न जुळल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका पोस्टमन तरूणीला भरधाव ट्रकने जागीच ठार केले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात रविवारी सायंकाळी घडली. फेब्रुवारी महिन्यात आयोजित साक्षगंधाच्या तयारीला असलेल्या परिवाराला अंतयात्रेची तयारी करावी लागली.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पोस्टमन तरूणी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
बेला : लग्न जुळल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका पोस्टमन तरूणीला भरधाव ट्रकने जागीच ठार केले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात रविवारी सायंकाळी घडली. फेब्रुवारी महिन्यात आयोजित साक्षगंधाच्या तयारीला असलेल्या परिवाराला अंतयात्रेची तयारी करावी लागली.
पल्लवी विजय भोयर (२२) रा. बेला असे मृत तरूणीचे नाव आहे. ती तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथे पोस्टमन पदावर कार्यरत होती. गत महिन्यात तिचे लग्न जुळले होते. १० फेब्रुवारीला तिचे साक्षगंध ठरले होते. संपूर्ण परिवार या कार्यक्रमाच्या तयारीत होता. अशातच काही कामानिमित्ताने पल्लवी भंडारा येथे आली होती. रविवारी सायंकाळी परत जाताना राष्ट्रीय महामार्गावरील पटवारी भवनजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्रमांक एमएच ३१ सीबी २३९०) तिच्या स्कुटीला जबर धडक दिली. त्यात तिच्या डोक्याला जबर दुखापत होवून जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती होताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. ट्रक चालक स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाला. या अपघाताची माहिती बेला येथे धडकताच तिच्या परिवाराचा आक्रोश आसमंत भेदणारा होता. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. तिच्या मागे आई, वडिल व एक भाऊ आहे. पल्लवीचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले असून तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तिच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.