दुभाजकावर दुचाकी आदळून विद्यार्थी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:03 IST2019-03-12T22:03:20+5:302019-03-12T22:03:38+5:30
भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तुमसर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथे मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली.

दुभाजकावर दुचाकी आदळून विद्यार्थी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तुमसर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथे मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली.
मंगेश हिरालाल बडवाईक (२७) रा.विनोबा नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. तर दीपक तितीरमारे (२७) रा.श्रीराम नगर तुमसर आणि राहुल सार्वे (२१) रा.मोहाडी असे जखमींची नावे आहेत. मंगेश बडवाईक आपल्या दोन मित्रांसह दुचाकी क्रमांक एमएच ३६ एडी ६१२८ ने कॅट्रीनचे सामान खरेदीसाठी नागपूर येथे जात होते. परंतु रस्त्यात त्यांनी आपला बेत रद्द केला. मौदा येथे रात्री एका हॉटेलमध्ये भोजन केले आणि परत तुमसरकडे ते दुचाकीने निघाले. खरबी नाका शिवारात त्यांची दुचाकी अनियंत्रीत होऊन दुभाजकावर आदळली. त्यात मंगेश बडवाईक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर दीपक व राहुल गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगेश बडवाईक हा आॅरेंज सिटी कॉलेजमध्ये समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला होता. अभ्यासात हुशार असलेल्या मंगेशच्या मृत्यूने तुमसर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. गत पाच महिन्यात तुमसर शहरातील दोघांचा अपघाती मृत्यू झाला.