चारा पिकाखाली येणार दोन हजार हेक्टर क्षेत्र
By Admin | Updated: February 16, 2015 00:38 IST2015-02-16T00:38:28+5:302015-02-16T00:38:28+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जनावरांसाठी चाऱ्याची समस्या भेडसावू नये, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

चारा पिकाखाली येणार दोन हजार हेक्टर क्षेत्र
भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जनावरांसाठी चाऱ्याची समस्या भेडसावू नये, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्र चारा पिकाखाली आणणार आहे.
धान उत्पादक जिल्हा असला तरी, अस्मानी संकट ओढवल्याने खरीप पीक होऊ शकले नाही. उन्हाळ्यात जनावरांसाठी चारा प्रश्न भेडसावणार आहे. ही परिस्थिती राज्यात उद्भवणार आहे. भंडारा जिल्ह्यात धानाचे मुख्य पीक असले तरी पावसाअभावी पीक करपली होती. त्यामुळे धानाचे उत्पादनही अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रबी पिकांकडे लक्ष केंद्रीत केले. मात्र, खरीप पीक हातचे गेले तर रबी पिकाची पेरणी मुदतीत झाली नाही. त्यामुळे रबीचे उत्पादनही घटनार आहे. धानापासून केवळ तणस उत्पादन झाले असून जिल्ह्यातील दुधाळ जनावरांचा आकडा बघता. दुधदुभत्या जनावरांसाठी उन्हाळ्यात हिरवा चारा आवश्यक आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होईल.
ही परिस्थिती बघून पशुधन विकास विभागाने जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळावा, यासाठी वैरण विकास योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मका व ज्वारीचे बीयाणे मोफत वाटप करणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना जिल्ह्यात अंमलात आणण्याचे ठरविले आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्र चारा पिकाखाली आणण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे.
यासाठी कृषी विभागाने साकोली तालुक्यातील २०० हेक्टर तर भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यातील ३०० हेक्टर क्षेत्रात चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शेतकऱ्यांना मका प्रति हेक्टर २५ किलो तर ज्वारी प्रती हेक्टर २१ किलोचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकाऱ्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)