देशी कट्टा बाळगणाऱ्या दोन इसमांना अटक
By Admin | Updated: August 25, 2015 00:47 IST2015-08-25T00:47:44+5:302015-08-25T00:47:44+5:30
देशी कट्टा विक्रीकरिता बाळगणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे.

देशी कट्टा बाळगणाऱ्या दोन इसमांना अटक
नेरला येथील घटना : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भंडारा : देशी कट्टा विक्रीकरिता बाळगणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे. ही कारवाई आज (सोमवारी) पवनी तालुक्यातील नेरला येथे करण्यात आली. दर्यावसिंग भावरी व नत्थासिंग भावरी अशी अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. नात्याने दोन्ही बापलेक आहेत.
पवनी तालुक्यातील नेरला येथील दोन इसम अवैधरित्या गावठी (हातबनावटीचे) देशी कट्टे तयार करून त्याची विक्री करतात, अशी विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. देशी कट्टा बनविणाऱ्यांची माहिती मिळताच सापळा रचण्यात आला. तसेच नेरला येथे नत्थासिंग व त्यांचा मुलगा दर्यावरसिंग या बापलेकांच्या घराची झडती घेण्यात आली.
यात एका काळ्या रंगाच्या पॉलीथीन पिशवीत बारुद व दुसऱ्या पिशवीत बंदुकीत वापरण्यात येणाऱ्या गोल व लांबट कट्टे तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. सदर पथकाने मुद्देमाल व दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार व कलम ५, स्फोटक पदार्थ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक प्रताप धरमशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)