बिबट्याच्या हल्ल्यात दोनजण जखमी
By Admin | Updated: June 19, 2016 23:11 IST2016-06-19T23:04:12+5:302016-06-19T23:11:55+5:30
संगमनेर/बोटा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना पिंप्री लौकी आजमपूर येथे रविवारी घडली. या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात दोनजण जखमी
संगमनेर/बोटा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना पिंप्री लौकी आजमपूर येथे रविवारी घडली. या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे. दुसरी घटना रविवारी दुपारी एक वाजता केळेवाडी शिवारातील उघडे वस्तीवर घडली.
रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पिंप्री लौकी आजमपूर येथील शेतमजूर धोंडीबा जीवबा ढोणे(वय ४०) हे याच परिसरातील नानासाहेब कुंडलीक मुंढे यांच्या पानोडी रोडवरील शेतामध्ये ऊस काढण्यासाठी गेले होते.
दरम्यान ऊस काढत असताना शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे ढोणे यांच्या अंगावर झडप घातली. बिबट्याला पाहून ढोणे यांनी आरडाओरड केली.
मात्र तोपर्यंत बिबट्याने ढोणे यांच्या हाताला कडाडून चावा घेतला. बिबट्याच्या तावडीतून स्वत:ला सोडविण्याच्या प्रयत्नात ढोणे यांच्या मांडीत दात घुसून खोलवर जखमा झाल्या.आवाज ऐकून घटनास्थळी पळत आलेल्या नानासाहेब मुंढे यांनी दगड उचलून बिबट्याच्या पाठीत मारला. त्यामुळे बिबट्याने ढोणे यांना सोडून धूम ठोकली.
दुसऱ्या घटनेत केळेवाडी शिवारातील उघडे वस्तीवर डाळिंब बागेलगतच्या रस्त्याने होनाजी सयाजी उघडे(वय २२) हा तरूण जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. हे पाहून बागेत काम करणाऱ्या शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याने होनाजी उघडे याच्या हात, पाठ व छातीला पंजाने ओरबडल्याने तो जखमी झाला.
जखमी अवस्थेतील उघडे यास उपचारासाठी बोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र हाताच्या खोलवर जखमेमुळे रक्तस्त्राव झाल्याने मंचर येथील (जि. पुणे) जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. माहिती मिळताच वनरक्षक झाकीर राजे व तान्हाजी फापाळे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)