दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

By Admin | Updated: September 5, 2015 00:44 IST2015-09-05T00:44:56+5:302015-09-05T00:44:56+5:30

मूलबाळ नाही, असे वारंवार टोचून बोलत असल्यामुळे दूरच्या एका नातेवाईकाने दुसऱ्याच्या मदतीने ६५ वर्षीय वृद्धेचा खून केला.

Two of the accused are sentenced to life imprisonment | दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

प्रकरण वृद्धेच्या खुनाचे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
भंडारा : मूलबाळ नाही, असे वारंवार टोचून बोलत असल्यामुळे दूरच्या एका नातेवाईकाने दुसऱ्याच्या मदतीने ६५ वर्षीय वृद्धेचा खून केला. त्यानंतर तिच्या साडेतीन वर्षाच्या नातवाचाही खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. शर्मा यांनी आज शुक्रवारला दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अजय गिरीपुंजे (३२) आणि विनोद नवखरे (४२) रा.आंधळगाव अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे २ एप्रिल २०१४ रोजी लीलाबाई माणिकराव मानकर (६५) यांचा मुलगा सुभाष मानकर हे पत्नीसह मुलाला आईजवळ ठेऊन नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी गेले होते. त्याच रात्री त्या दोघांनी लिलाबाईचा गळा आवळून खून केला. त्यादरम्यान सुभाषला बाहेरगावी असतानाच आईचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तिथून परत येत नाही तोपर्यंत विनोद नवखरे याने लीलाबाईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती. यावर संशय आल्यामुळे सुभाष मानकर यांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. विनोद लीलाबाईचा दूरचा नातेवाईक असून त्याला ११ वर्षानंतरही मुलबाळ नव्हते. त्यामुळे लीलाबाई त्याला बोलत होत्या. त्यामुळे या वृद्धेचा वचपा काढण्याचा विचार विनोदच्या मनात घोळत होता. घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपींनी खून करण्याची योजना आखली. २ एप्रिलच्या रात्री घरात प्रवेश केला. त्यावेळी लिलाबाई नातवासोबत झोपून होत्या. झोपेतच या आरोपींनी तिचा गळा आवळून खून केला. आणि चोरी झाल्याचा देखावा करुन १.६० लाखांचे दागिने पळवून नेले.
या प्रकरणात सरकारी पक्षाने १९ साक्षीदारांचे बयान घेतले. यावर अंतिम सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एैकल्यानंतर न्या. एस. के. शर्मा यांनी आरोपींना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. आय.ए. सिद्धीकी यांनी युक्तीवाद केला. (जिल्हा प्रतिनिधी)
नातवाचे बयाण ठरले महत्त्वपूर्ण
लिलाबाईचा साडेतीन वर्षीय नातून खुश मानकर हा महत्त्वपूर्ण साक्षीदार ठरला आहे. लीलाबाईचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगून अंत्यसंस्कार करण्यासाठी सुभाष मानकरवर दबाव आणत होते. परंतु या घटनेत आरोपींनी गळा दाबलेल्या खुशने आजीचा मामाने गळा दाबल्याचे सांगितले. शिक्षेसाठी हे बयान महत्त्वपूर्ण ठरले.

Web Title: Two of the accused are sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.