एकाच मालमत्तेची दोनदा रजिस्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:24 IST2017-05-24T00:24:17+5:302017-05-24T00:24:17+5:30

सन १९९१ ते १९९५ मध्ये शहरातील सात व्यक्तींनी एकाकडून दुकानाची चाळ विकत घेतली.

Twice the Registry of Single Property | एकाच मालमत्तेची दोनदा रजिस्ट्री

एकाच मालमत्तेची दोनदा रजिस्ट्री

भूमिअभिलेख कार्यालयाचा प्रताप : महसूलच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सन १९९१ ते १९९५ मध्ये शहरातील सात व्यक्तींनी एकाकडून दुकानाची चाळ विकत घेतली. २० वर्षानंतर दुकानाच्या चाळीवरील पहिला मजला दुसऱ्याला त्याच मालकाने विकला. त्याची रजिस्ट्रीही झाली. फेरफारही करण्यात आले. येथे एकाच तारखेला संबंधित कार्यालयाने नोटीसा दिल्या व त्याच तारखेला फेरफार केले. यासर्व प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार राज्याचे महसूल राज्यमंत्र्याकडे जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेंद्र पटले यांनी केली आहे.
अन्यायग्रस्त नरेंद्र गणपत मेश्राम, रेखा भास्कर आंबीलढुके, विमल प्रभाकर आंबीलढुके, अनिल श्रावण वंजारी, सुनिल श्रावण वंजारी, दयाराम राघोजी थोटे, सुरेश विठोबाजी ढबाले यांनी सन १९९१ ते १९९५ मध्ये अल्का ओमप्रकाश अजित सरीया यांचेकडून दुकानाची चाळ (मालमत्ता) विकत घेतली.
मालमत्ता क्रमांक ३ सिट क्रमांक ४२ सिटी स.नं. ३९०७ क्षेत्रफळ ३१२.८ चौ.मी. पैकी १५६.४५ चौ.मी. खरेदी केली. दुकानावरील पहिला मजला २० वर्षानंतर दुसऱ्यांना त्याच मालकाने विक्री केला. या सातही जणांनी सदर दुकाने संपूर्ण बांधकाम व जमिनीसहीत विकत घेतले होते हे विशेष.
मालमत्ता विक्री करणाऱ्याने पुन्हा त्या दुकानावरचा भाग दुसऱ्यांना विक्री करून रजिस्ट्री सुद्धा खरेदी करणाऱ्यांना करून दिली. विक्री झालेल्या मालमत्तेचा फेरफार पण करवून घेतला. येथे फेरफार करण्यापुर्वी संबंधित खात्याने सूनावणी घेण्याची गरज होती. एकाच तारखेला नोटीसा व त्याच तारखेला फेरफार भूमी अभिलेख कार्यालयाने केले आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद असून येथे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे.
फेरफारची तारीख ८ मे २०१७ असून त्याच तारखेला म्हणजे ८ मे २०१७ ला येथे नोटीस काढल्या आहेत. नियमानुसार तिथे आक्षेप असल्यास किमान आठ दिवस देण्याची तरतूद आहे. या प्रकरणात संबंधित खात्याचे अधिकारी आठ तास थांबले नाहीत. हा संशोधनाचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणात येथे अर्जदारांनी २ मे २०१७ ला नोंदणी न करण्याबाबत तुमसर येथे भूमी अभिलेख कार्यालयात आक्षेप नोंदविला. ८ मे ला त्याचे उत्तर लिहीण्यात आले. ८ मे ला कोणतीही सुनावणी न करता ८ मे ला गैरअर्जदारांचा फेरफार करण्यात आला. विमल प्रभाकर आंबिलढुके यांची मालमत्ता क्रमांक ३ सीट क्रमांक ४२, सिटी सर्व्हेक्रमांक ३९०७ या मालमत्तेत असलेली मुळ जागा आखिव पत्रिकेत ७० चौ.मी. आहे. नवीन आखिव पत्रिकेत केवळ ८.३८ चौ.मी. नोंदणी केली आहे. सदर आखिव पत्रिकेत कसा बदल करण्यात आला, हा संशोधनाची बाब आहे. सदर गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेंद्र पटले यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना केली असून सदर कार्यालयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Twice the Registry of Single Property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.