बिनाखी गोंडीटोला रस्त्याचे दोनदा भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:36 IST2021-02-24T04:36:15+5:302021-02-24T04:36:15+5:30

चुल्हाड (सिहोरा) : बिनाखी गोंडीटोला मार्गाचे दोन आमदारांनी दोनदा भूमिपूजन केले असले तरी मार्गाच्या डांबरीकरणवरुन शंकांना उधाण आले आहे. ...

Twice Bhumipujan of Binakhi Gonditola Road | बिनाखी गोंडीटोला रस्त्याचे दोनदा भूमिपूजन

बिनाखी गोंडीटोला रस्त्याचे दोनदा भूमिपूजन

चुल्हाड (सिहोरा) : बिनाखी गोंडीटोला मार्गाचे दोन आमदारांनी दोनदा भूमिपूजन केले असले तरी मार्गाच्या डांबरीकरणवरुन शंकांना उधाण आले आहे. या मार्गावरील पुलावर जीवघेणे भगदाड पडले असून, खड्ड्यात माती घालण्यात आली आहे. यामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. मार्गावरून ये-जा करताना वाहनचालकात भीती निर्माण होत आहेत. दरम्यान, आधी डांबरीकरण करा, नंतर उदघाटन करा. अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

ब्राह्मणटोला, बिनाखी, गोंडीटोला, सुकली नकुल, असे नियोजित असणाऱ्या पाच किमी अंतरच्या खडीकरण रस्त्याचे डांबरीकरणला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन २०१९-२० या कालावधीत मंजुरी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या सरत्या कालावधीत माजी आमदार चरण वाघमारे यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. परंतु रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंटकरणच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही. राज्यात सरकार गठन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामे सुरू करण्यात आले नाही. नंतर कोरोना संसर्गच्या कालावधीत लॉकडाऊन घोषित झाले असता विकासकामांना ब्रेक लावण्यात आले. नियोजित कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली असता लॉकडाऊननंतर कामे सुरू करण्यात आली. परंतु ब्राह्मणटोला ते सुकली नकुल गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे कामांना सुरुवात करण्यात आली नाही. या मार्गावर साधी गिट्टी, रेती, तथा अन्य कामे सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. कोरोना संसर्गच्या कालावधीत अनेक कामे निधीअभावी लांबणीवर घालण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. ज्या कामांना सुरुवात करण्यात आली असता अशाच कामांना पूर्ण करण्याचे मंजुरी प्रदान करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. नवीन कामे सुरू करण्यात आले नाही. निधीचा वानवा असल्याने महालगाव फाटा ते सुकली नकुल गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अडले आहे. कंत्राटदाराने डोक्यावर हात ठेवले आहे.

ब्राह्मणटोला ते सुकली नकुल गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी नुकतेच आमदार राजू कारेमोरे यांचे हस्ते दुसऱ्यादा भूमिपूजन करण्यात आले आहे. एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन होऊन सुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली नाही. दरम्यान, आधी माजी आमदार चरण वाघमारे यांचे हस्ते भूमिपूजन झाले होते. आता आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होते, असे नागरिक अपेक्षित होते. परंतु झाले उलटेच भूमिपूजनच करण्यात आले आहे. या मार्गावरील पुलावर जीवघेणे भगदाड पडले आहेत. लोकमतने शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर आणले असता खडबडून जागे झाले. या खड्ड्यात माती घालण्यात आली आहे. कुणी घातली सांगायला तयार नाहीत. ही माती सुद्धा पुलात गेली असल्याने भगदाडाची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या मार्गावरून वाहने धावत आहेत. खड्ड्यात वाहने आदळण्याची शक्यता आहे. बिनाखी गावातच गोंडीटोला गावांचे वळणावर असणाऱ्या पुलावर भगदाड आहे. भीतीदायक भगदाड असल्याने रात्रीचा प्रवास या मार्गावरून टाळण्यात येत आहे.

मार्गाचे दुतर्फा अतिक्रमण

बिनाखी ते गोंडीटोला गावापर्यंत जोडणाऱ्या ३ किमी अंतरच्या मार्गावर वाढते अतिक्रमण आहे. शेतकऱ्यांनी मार्गाचा बहुतांश भाग शेतीत गिळंकृत केला आहे. यामुळे मार्गाची अवस्था पांदण रस्त्याची झाली आहे. रस्त्याचे दुतर्फा झाडे, झुडपी वाढली आहे. शेतीचे धुरे थेट रस्त्यावर आली आहेत. यामुळे निरंतर या मार्गावर अपघात होत आहेत. रस्ता अरुंद झाला आहे. दुहेरी वाहने धावताना कसरत करावी लागत आहे. वाढते अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे. याच मार्गावरून अधिक वर्दळ राहत असल्याने अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.

" गोंडीटोला ते बिनाखी मार्गाचे दोनदा भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात आली नाही. भूमिपूजनाचे गोंधळात मार्गाचे डांबरीकरण अडले आहे. यामुळे तत्काळ कामांना सुरुवात झाली पाहिजे.

- किशोर राहगडाले, युवा नेते भाजप, बपेरा

Web Title: Twice Bhumipujan of Binakhi Gonditola Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.