भंडाऱ्यावरून एसटीच्या चार बसेसच्या १२ फेऱ्या निघाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:00:44+5:30
खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. कर्मचारी मात्र कोणत्याही परिस्थितीत कामावर येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत गत आठ दिवसांपासून महामंडळाने काही बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. सर्वप्रथम साकोली आगारातून आठ दिवसापासून भंडारापर्यंत दररोज दोन बसच्या आठ फेऱ्या सुरू आहे. दरम्यान बुधवारी भंडारा-पवनी आणि भंडारा-नागपूर अशा दोन बस काढण्यात आल्या. पवनी बस भंडारा स्थानकावरून १२.३० वाजता सुटली.

भंडाऱ्यावरून एसटीच्या चार बसेसच्या १२ फेऱ्या निघाल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तब्बल ४० दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गत आठ दिवसांपासून काही बसफेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी भंडारा बसस्थानकावरून चार बसेसच्या १२ फेऱ्या झाल्या. नागपूरला गेलेल्या बसमध्ये खचाखच प्रवासी भरून होते. संप मिटविण्यासाठी स्थानिक पातळीवरही अधिकारी प्रयत्न करीत आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. कर्मचारी मात्र कोणत्याही परिस्थितीत कामावर येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत गत आठ दिवसांपासून महामंडळाने काही बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. सर्वप्रथम साकोली आगारातून आठ दिवसापासून भंडारापर्यंत दररोज दोन बसच्या आठ फेऱ्या सुरू आहे. दरम्यान बुधवारी भंडारा-पवनी आणि भंडारा-नागपूर अशा दोन बस काढण्यात आल्या. पवनी बस भंडारा स्थानकावरून १२.३० वाजता सुटली. त्यात जाताना ३८ तर येताना ४५ प्रवासी होते. नागपूरसाठी दुपारी २.३० वाजता सुटलेल्या बसमध्ये तब्बल ५८ प्रवासी होते. दोन बसेसच्या १२ फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रवाशांसी संवाद
भंडारा ते पवनी या बसमध्ये विभागीय वाहतूक नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी बुधवारी स्वत: प्रवास केला. त्यावेळी त्यांनी प्रवाशांसी संवाद साधला. एसटी बसच्या दोन फेऱ्या का होईना सुरू झाल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. या बसमधून अनेक विद्यार्थ्यांनी प्रवास केला. बससेवा सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा यावेळी सर्वच प्रवासी व्यक्त करीत असल्याचे डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना आवाहन
- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेळोवेळी आवाहन केले. याबाबत भंडारा विभागाचे विभागीय वाहतूक नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी गत दोन दिवसात आंदोलनात असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. आगारासमोर सुरू असलेल्या मंडपात भेट देवून त्यांनी परिवहन मंत्र्यांना निरोप दिला. प्रथम कामावर हजर व्हा, योग्य न्याय मिळेल असे सांगितले. परंतु अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही.