वरठी-पांढराबोडी रस्ता पुन्हा बंद
By Admin | Updated: October 1, 2014 23:18 IST2014-10-01T23:18:45+5:302014-10-01T23:18:45+5:30
वरठी-पांढराबोडी रस्त्यावर तारांचे कुंपण घातल्यामुळे रस्ता बंद होण्याच्या स्थितीत आहे. कुंपणामुळे अर्ध्यापेक्षा रस्ताचा जास्त भाग बंद झाला आहे. २०११ मध्ये मनोहर मदनकर यांनी अतिक्रमण केले

वरठी-पांढराबोडी रस्ता पुन्हा बंद
चार वर्षानंतर पुन्हा अतिक्रमण : रस्ता मोकळा करून देण्याची मागणी
वरठी : वरठी-पांढराबोडी रस्त्यावर तारांचे कुंपण घातल्यामुळे रस्ता बंद होण्याच्या स्थितीत आहे. कुंपणामुळे अर्ध्यापेक्षा रस्ताचा जास्त भाग बंद झाला आहे. २०११ मध्ये मनोहर मदनकर यांनी अतिक्रमण केले म्हणून जिल्हा परीषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण पाडले होते. तीन वर्षानंतर त्याच भागात पुन्हा तारांचा कंपाऊंड केल्यामुळे परिसरातील रहिवासी यांच्यासह पांढराबोडी वासियांना त्रास होत आहे. रस्ता अतिक्रमणमुक्त करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
वरठी-पांढराबोडी रस्ता हा मोहाडी-भंडारा तालुक्याच्या सिमेवर आहे. जगनाडे चौकातून भारत गॅस एजंसी जवळून अनेक वर्षापासून या रस्त्यावरून रहदारी सुरू होती. या मार्गावर वरठी, सिरसी, पांढराबोडी, बीड, एकलारी येथील नागरिकांची शेती आहे. पांढराबोडी व सनफ्लॅग कॉलोनीला जाण्याकरीता एकमेव रस्ता आहे. दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून आवागमन करत असून स्वातंत्र्यापूर्व काळापाूसन सदर रस्त्यावरून रहदारी सुरू होती.
पांढराबोडी येथून वरठीला येण्याकरीता एकमेव जवळचा रस्ता आहे. भंडाऱ्याला जाण्याकरिता 'शॉर्टकट' रस्ता म्हणून शेकडो दुचाकीस्वार या रस्त्याचा वापर करतात. पांढराबोडी येथे दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. हा रस्ता बंद झाल्यास पांढराबोडीला जाण्याकरिता भंडारा येथून उलट मार्गाने जावे लागेल.
रस्त्याच्या पलीकडे भंडारा तालुक्यातील सिरसी गावाच्या हद्दीत मोडणारी ५० घरांची वस्ती आहे. त्यांना जाण्या-येण्याचा मार्ग नाही. एकंदरीत या रस्त्याच्या वादात गावकरी व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होत आहे. पण बदलत्या काळात सिमेंटच्या जंगलात हा रस्ता अदृश्य झाल्याचे दिसते. अतिक्रमण कोणी केले हा शोध घेऊन लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)