१३० रुपये किलो दराने तूर डाळ
By Admin | Updated: November 5, 2015 00:43 IST2015-11-05T00:43:33+5:302015-11-05T00:43:33+5:30
तुरडाळीचे भाव गरीबांच्या आवाक्याबाहेर जात असताना दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत केला जात आहे.

१३० रुपये किलो दराने तूर डाळ
योजनेचा शुभारंभ आज : विदर्भ दाल मिलरर्सचा पुढाकार
भंडारा : तुरडाळीचे भाव गरीबांच्या आवाक्याबाहेर जात असताना दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत केला जात आहे. विदर्भ दाल मिलर असोसिएशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त वतीने ग्राहकांना १३० रुपये किलो दराने तुरडाळ देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ५ नोव्हेबर पासून पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा विभाग, विदर्भ दाल मिलर असोसिएशन आणि राशन दुकानदार यांची बैठक पार पडली. नागपूर मध्ये जिल्हा प्रशासन आणि विदर्भ दाल मिलर असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने माफक दरात ग्राहकांना डाळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचपध्दतीने भंडारा जिल्ह्यातील ग्राहकांना सुध्दा स्वस्त दरात डाळ मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील होते. त्यासाठी बैठक घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली. विदर्भ दाल मिलर असोसिएशन भंडारा जिल्हयासाठी १२७ रुपये किलो दराने डाळ उपलब्ध करून देण्यास तयार झाले. ही डाळ जिल्ह्यातील शासकिय गोदामात पोहचवण्याची जबाबदारी सुध्दा विदर्भ दाल मिल असोसिएशनने घेतली आहे. त्यानंतर तेथून कोणतेही दुकानदार आणि स्वस्त धान्य दुकानदार यांना ही डाळ उपलब्ध करून देण्यात येईल . मात्र दुकानदारांना ही डाळ ग्राहकांना १३० रुपये प्रती किलो पेक्षा जास्त दराने विकता येणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ५०० क्विंटल डाळ मागविण्यात आली आहे. यामध्ये भंडारा १००, तुमसर १००, पवनी १००, मोहाडी ५०, साकोली ५०, लाखनी ५०, लाखांदूर ५० क्विंटल याप्रमाणे सर्व तालुक्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मागणीनूसार पुन्हा डाळ आयात करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले.सर्व रास्त धान्य दुकानदार आणि भंडारा शहरातील कटकवार किराणा बडा बाजार, पंकज किराणा गांधी चौक, संतोष किराणा बडा बाजार, थवेश किराणा बडा बाजार येथे उपलब्ध होणार आहे. (नगर प्रतिनिधी)