तंमुस अध्यक्षासह १२ जणांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: May 13, 2015 00:47 IST2015-05-13T00:47:09+5:302015-05-13T00:47:09+5:30
शंकरपटावर बंदी असतानाही महालगावात नियम आणि निर्देश यांना झुगारून दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले.

तंमुस अध्यक्षासह १२ जणांवर गुन्हे दाखल
चुल्हाड (सिहोरा) : शंकरपटावर बंदी असतानाही महालगावात नियम आणि निर्देश यांना झुगारून दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणात तंमुसच्या अध्यक्षासह पट समितीच्या १२ जणांवर सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
शंकरपट आयोजनाची माहिती दडविल्या प्रकरणी महालगाव आणि ब्राम्हणटोला येथील पोलीस पाटलांचे पदेही अडचणीत आली आहेत. महालगाव येथील बावनथडी नदीच्या पात्रात बैलांच्या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. सिहोरा पोलीसांनी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत ३६ पुरस्कारांचा समावेश करण्यात आलेला आहे. पट समितीत तंमुसचे अध्यक्ष राधेश्याम बनकर यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले तर समितीच्या मंडळात ११ जणांचा समावेश करण्यात आला. या शिवाय संचालक मंडळ म्हणून ५१ जणांचे गठीत करण्यात आले. या शंकरपटांचे पत्रक महिनाभरापासून गावागावात वाटप करण्यात आले. विशेषत: मध्यप्रदेशातील गावात मोठ्याने पत्रक देण्यात आले. यामुळे ६०-७० बैलजोडी तथा चालक आणि मालकांनी या पटात सहभाग घेतला. शंकर पटाच्या उद्घाटन सोहळ्यात राजकीय पुढारी, सरपंच तथा पोलीस पाटीलांनी हजेरी लावली. ६ मे ला अनेक बैलजोडी या पटात धावल्या. दिवसा ढवळ्या कुठलीही मंजुरी नसताना तथा बंदी असताना बैलांना शंकरपटात चाबकांचे फटाके देण्यात आले. ७ मे रोजी बक्षिस वितरण सोहळ्यात बडे राजकीय पुढाऱ्यांनी विजेत्या बैलजोडींना पुरस्कृत केले. या पटाची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी आयोजित स्थळाकडे धाव घेतली. पोलीस पोहचताच कार्यक्रमाचे समारोप झाले होते. या कार्यक्रमाची चित्रफित तयार करून पोलीस माघारी परतले. या शंकरपटांची माहिती गावचे दोन्ही पोलीस पाटलांनी ठाण्यात दिली नाही. यामुळे त्यांचे पदे अडचणीत झाली आहेत. शंकरपटात सहभागी बैलजोडीचे चालक आणि मालकांचा शोध पोलीस घेत आहे. नियमबाह्य शंकरपटांच्या आयोजनावरून सिहोरा पोलीस ठाण्यात तंमुसचे अध्यक्ष तथा पट समितीचे अध्यक्ष राधेश्याम बनकर, उपाध्यक्ष नंदा शहारे, सचिव नागोराव किरणापुरे, कोषाध्यक्ष शंकर बांडेबुचे, सदस्य हेमराज शहारे, यशवंत किरणापुरे, लोकेश डोमळे, झनक बांडेबुचे, हौसीलाल पटले, संतोष किरणापुरे, राधेश्याम किरणापुरे, पुरुषोत्तम बनकर इतर बैलजोडीचे चाल आणि मालक विरोधात भादंवी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (वार्ताहर)