तुमसरकरांना गढूळ पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 21:52 IST2019-03-26T21:51:48+5:302019-03-26T21:52:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : पाणी जीवन आहे, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी स्थानिक प्रशासन घेते, परंतु तुमसरात मागील दोन ...

तुमसरकरांना गढूळ पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पाणी जीवन आहे, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी स्थानिक प्रशासन घेते, परंतु तुमसरात मागील दोन महिन्यापासून नेहरू, मालवीय व विवेकानंद वॉर्डात गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणी काळसर रंगाचे असून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तर सोडाच पण इतर वापरातही हे पाणी उपयोगी पडत नाही. मंगळवारी स्थानिक वॉर्डातील महिलांनी नगरपरिषदेवर धडक देऊन मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडून संताप व्यक्त केला.
शहरातील नेहरू, मालवीय व विवेकानंद वॉर्ड जूने आहेत. सदर वॉर्डात मागील दोन महिन्यापासून अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. नालीतील सांडपाण्यासारखा रंग असलेले पाणी पिण्यासाठी घातक आहे.
या पाण्याची दुर्गंधी येत आहे. अगदी काळसर असे दुर्गधीयुक्त असे हे पाणी आहे.
सदर समस्या सांगितल्यावरही आतापर्यंत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. पुन्हा किती दिवस दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा सुरू राहील, असा जाब विचारण्याकरिता २५ ते ३० महिला पुरूष थेट नगरपरिषदेत पाण्यासह दाखल झाले.
मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्या कक्षात बॉटलमध्ये व बादलीत भरून आणलेले पाणी त्यांना दाखविले, असे दुर्गंधीयुक्त व काळसर गढूळ पाणी प्राशन करावे काय, शुद्ध पाणीपुरवठा केव्हा सुरू करणार असा प्रश्न विचारला.
तसेच जलवाहिनी दुरूस्तीची कामे केव्हा सुरू करणार असा प्रश्नांचा भडीमार संतप्त नागरिकांनी यावेळी केला. यावेळी महिला-पुरूष संतप्त झाले होते. किमान पाणीपुरवठा तरी नियमित करा, येत्या दोन दिवसात गढूळ पाणीपुरवठा बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा उपस्थित महिला-पुरूषांनी दिला.
शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजेश देशमुख, नर्मदा मेहर, प्रभा पाटील, जगन्नाथ गायधने, अशोक पाटील, ममता आथीलकर, उमेश लांजेवार, छाया जिभकाटे, वैशाली डाबरे, रूकमा बांगळकर, राजू येळणे, लिला चोपकर, उर्मिला आंबीलढुके, शांतकला गभने, कविता चोपकर, चंदा चोपकर, लता चोपकर यांचा समावेश आहे.