तुमसर-तिरोडी प्रवासी रेल्वे १४ महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:49+5:302021-06-06T04:26:49+5:30
तुमसर : रेल्वेला मोठे उत्पन्न देणारी आणि तालुक्यासह मध्य प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर ते तिरोडी ही ...

तुमसर-तिरोडी प्रवासी रेल्वे १४ महिन्यांपासून बंद
तुमसर : रेल्वेला मोठे उत्पन्न देणारी आणि तालुक्यासह मध्य प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर ते तिरोडी ही आंतरराज्यीय रेल्वे कोरोना संकटामुळे गत १४ महिन्यांपासून बंद आहे. या रेल्वेने प्रवास करून अनेक जण लहान-मोठा व्यवसाय करीत होते. वैद्यकीय उपचारासाठी अनेक रुग्ण या रेल्वेने महाराष्ट्रात येत होते. आता गत १४ महिन्यांपासून रेल्वे सेवा बंद असल्याचा फटका सर्वांना बसत असून अनेक लघू व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. तर रेल्वे प्रशासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.
तुमसर ते मध्य प्रदेशातील हिरवळीदरम्यान दिवसातून चार वेळा प्रवासी रेल्वे गाडी धावत होती. शेकडो प्रवासी प्रवास करीत होते. मध्य प्रदेशातून दूध, दही, भाजीपाला व इतर साहित्य घेऊन व्यावसायिक येत होते. सकाळी ९ वाजता ही गाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकावरून इतवारी नागपूर येथे जात होती. त्यामुळे मध्य प्रदेशातील अनेक नागरिकांना नागपूरपर्यंत जाणे सोयीचे झाले होते. तिकिटाचे दरही कमी आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना परवडणारी गाडी होती. मध्य प्रदेशातील अनेक रुग्ण तुमसर तसेच भंडारा, नागपूर येथे उपचाराकरिता जात होते. या प्रवासी गाडी बंदमुळे त्यांचे येणे बंद झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या अनेक रेल्वे आता सुरू होत आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित ही रेल्वे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी तुमसर व मध्य प्रदेशातील प्रवासी करीत आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू
तुमसर ते तिरोडी प्रवासी रेल्वे बंद केली. दुसरीकडे मुंबई-हावडा मार्गावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वर्षभरापासून धावत आहेत.
त्यामुळे तुमसर तिरोडी या प्रवासी गाडीला वेगळा नियम आहे काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. ही आंतरराज्य गाडी महत्त्वपूर्ण असून तुमसर तालुक्यातील व मध्य प्रदेशातील अनेक गावे या मार्गावरील रेल्वे स्थानकांना जोडलेली आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. बंद गाडीमुळे प्रवाशांची निराशा झाली असून रेल्वेचा लाखोंचा महसूल बुडाला आहे.