तुमसर नगर पालिकेची स्वच्छ भारत अभियानात निवड
By Admin | Updated: April 19, 2016 00:29 IST2016-04-19T00:29:35+5:302016-04-19T00:29:35+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपुर्ण महाराष्ट्रातील एकूण २१६ नगर परिषदेपैकी फक्त १७ न.प. ची निवड शासनातर्फे झाली आहे.

तुमसर नगर पालिकेची स्वच्छ भारत अभियानात निवड
राहुल भुतांगे तुमसर
स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपुर्ण महाराष्ट्रातील एकूण २१६ नगर परिषदेपैकी फक्त १७ न.प. ची निवड शासनातर्फे झाली आहे. त्यामध्ये तुमसर न. प. चाही समावेश झाल्याने आजवरच्या इतिहासात न.प. उत्युंग भरारी घेतली आहे. निवड झालेल्या नगरपरिषदेची प्रगत व उद्दिष्ट तपासणीकरिता शासनाने १२ सदस्य समिती गठीत केली असून ती लवकरच तुमसरात दाखल होणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील नगर परिषद वाई, महाबळेश्वर, पाचगणी, करुंदवाड, पंढरपूर, मंगळवेढा, कुर्डवाडी, राहुरी, शिर्डी, चाळीसगाव, वैजापुर, बल्लारपुर, सातारा, कांगल, रामटेक, काटोल व तुमसर अशा १७ नगर परिषदेने आपल्या कार्यात चांगली प्रगती दाखविली. नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या तर्फे आदेशानुसार आदेश पारित करुन १२ सदस्यीय समिती गठीत केली असून त्या समितीचे अध्यक्ष अनिल मुळे उपसंचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय मुंबई हे आहेत तर राजेंद्र चव्हाण (पुणे), उदय कुलवरकर (बुलढाणा), गणेश शेटे (लोणावळा), रामदास कोकरे (वेंगुर्ला), सुनिल बल्लाळे (दर्यापुर), विजय सरनाईक (उमरेड), रमाकांत डाके (सांगोली), कल्पना अंधारे (मुंबई), तेजस्विनी देशमुख (मुंबई), रश्मी जोशी (मुंबई) व सुनिता सदाफुले (मुंबई) यांच्या १२ सदस्यीय समितीत समावेश असून समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीने नगर परिषदेला प्रत्यक्ष भेट देवून त्या त्या नगर परिषदेमध्ये ओल्या कचऱ्याचे १०० टक्के संकलन केले जाते का? व कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण केले जाते काय? शहर ९० टक्के हागणदारी मुक्त झाले का? शहरात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पॉलिथीनवर बंदी घालण्यात आली काय? आदी बाबी समिती तपासणार आहे. त्यामुळे तमुसर नगरपरिषदेचे अध्यक्ष अभिषेक कारेमोरे मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने सर्व नगरसेवक तसेच कर्मचारी जोमाने कार्याला लागले आहेत.