तुमसर-देव्हाडी रस्ता खड्डेमय
By Admin | Updated: November 8, 2014 22:32 IST2014-11-08T22:32:41+5:302014-11-08T22:32:41+5:30
तुमसर-देव्हाडी पाच कि़मी. चा रस्ता अक्षरक्ष: खड्डेमय झाला असून या रस्त्याचा सुमारे दररोज २५ हजार नागरिकांना फटका बसत आहे. यामुळे नागरिकांना पाठीचे व मानेचे आजार जडले आहेत.

तुमसर-देव्हाडी रस्ता खड्डेमय
तुमसर : तुमसर-देव्हाडी पाच कि़मी. चा रस्ता अक्षरक्ष: खड्डेमय झाला असून या रस्त्याचा सुमारे दररोज २५ हजार नागरिकांना फटका बसत आहे. यामुळे नागरिकांना पाठीचे व मानेचे आजार जडले आहेत. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या रस्त्याची मालकी सध्या संभ्रमात आहे. निवडणुकीपूर्वी १ कोटी ३० लक्षाचा निधी येथून मंजूर झाला होता.
तुमसर-देव्हाडी हा रस्ता पाच कि़मी. चा असून शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. रेल्वेस्थानक असल्याने तथा शाळा, महाविद्यालय, व्यापारी व सर्वसामान्य सुमारे २५ हजार नागरिक दररोज या मार्गाने ये-जा करतात.
सुमारे दोन ते अडीच कि़मी. चा रस्ता अतिशय खड्डेमय आहे. रस्त्यावर अर्धा फूटाचे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर जिल्हा परिषदेची मालकी होती. जिल्हा परिषदेकडे एकाच रस्त्यावर मोठा निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा रस्ता वर्ग करण्याच्या हालचाली मागे झाल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्यावर सहा ते सात महिन्यापूर्वी दोन ते अडीच लाखाचा निधी दिला होता. या निधीतून काही प्रमाणात खड्डे बुजविण्यात आले होते. रस्त्यावर वर्दळ जास्त असल्याने व जड वाहतुकीमुळे पुन्हा रस्ता खड्डेमय झाला आहे. संबंधित विभागाची येथे पुन्हा निधीची प्रतिक्षा आहे.
या रस्त्यावर दररोज लहान अपघात होत आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पाठीचे व मानेचे आजार जडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. आॅटोचालकांचे तथा इतर वाहनांची सुद्धा वाताहत होत आहे. नाईलाजाने या मार्गावरूनच मात्र नागरिकांना मार्गक्रमण करणे लागत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करणे हा एकमेव मार्ग आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्यावर १ कोटी ३० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात बांधकामाला केव्हा सुरूवात होईल याची प्रतिक्षा येथे आहे. आमदार चरण वाघमारे यांनी येथे पाठपुरावा करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)