पवनीच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार
By Admin | Updated: May 8, 2015 00:44 IST2015-05-08T00:44:58+5:302015-05-08T00:44:58+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगरपालिका असलेल्या पवनी नगराची लोकसंख्या कमी झाली.

पवनीच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार
पवनी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगरपालिका असलेल्या पवनी नगराची लोकसंख्या कमी झाली. येथील विणकर समाज उद्योगधंद्याअभावी स्थालांतरीत झाला. स्थलांतरीत नागरिकांना पूर्ववत त्यांच्या स्वगावी परत आणण्यासाठी नगराचा औद्योगिकदृष्ट्या विकास होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.
पवनी नगरपरिषदेच्यावतीने राजीव गांधी सभागृहात आयोजित नगरपालिका कर्मचारी सत्कार व सेवानिवृत्त कर्मचारी धनादेश वाटप समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, नगराध्यक्ष रजनी मोटघरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपाध्यक्ष विजय ठक्कर उपस्थित होते. यावीळी पालकमंत्री डॉ.सावंत यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडून संरक्षित ठिकाणापासून ३०० मिटरपर्यंत बांधकाम करण्यास येणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रशासनापर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. वैनगंगा नदीच्या दूषित पाण्याबद्दल चिंता व्यक्त करून नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी पवनीकरांना दिले. यावेळी त्यांच्या हस्ते मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत सेवानिवृत्ती वेतन धनादेशाचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी केले. नगराध्यक्ष रजनी मोटघरे यांनी मार्गदर्शन केले. संचालन भगवान जनबंधू यांनी तर आभारप्रदर्शन विवेक कापगते यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)