नवेगाव शेतशिवारातील घटना : अड्याळ पोलिसात शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखलचिचाळ : इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्पाच्या नेरला उपसासिंचन योजनेतील उपवितरिकेचे बांधकामाला १८९४ च्या कायद्यानुसार रेडीरेकनरनुसार अल्प मोबदला देण्यात आला. अड्याळ, सौंदळ, नवेगाव, (पाले) सोनेगाव, सोमनाळा, कोंढा आदी गावातील शेतशिवारातून गेलेल्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळाल्याने काहीनी मोबदला उचलला तर काहीनी मोबदला उचललाच नाही. त्यामुळे दोन वर्षापासुन कालव्याचे बांधकाम संथ गतीने सुरु आहे. अखेर एका शेतकऱ्याने पोकलॅड मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. त्या शेतकऱ्याविरुध्द अड्याळ पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.विदर्भातील महत्वाकांक्षी इंदिरा सागर गोसे प्रकल्पाचा नेरला उपसा सिंचन योजनेच्या उपवितरीकेकरीता शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली. अड्याळ जवळील नवेगाव (पाले) व सोनेगाव येथील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन नेरला उपसा सिंचनाच्या कोसरा व सोमनाळा वितरिकेत संपादीत करण्यात आली. सन २०१० मध्ये कामाला सुरुवात झाली मात्र त्याचा निर्वाळा २०१२-१३ ला करण्यात आला. पिडीत शेतकऱ्यांनी संपादीत जमीनीचा जुना निवाडा रद्द करुन नव्याने निवाडा करुन योग्य मोबदला देण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन यापुर्वी शासन प्रशासनाला देण्यात आले.नवेगाव हे ठिकाण अधिकाऱ्यांनी अड्याळपासून १४ किमी अंतरावर दाखविण्यात आले. प्रत्यक्ष हे अंतर ३ किमी आहे. शासनाने हजार रुपये एकर याप्रमाणे संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला. हा मोबदला सन १९८४ च्या कायद्यानुसार देण्यात आला. निवाडा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना सन २०१३ च्या भू-संपादन कायद्यानुसार मोबदला देणे गरजेचे असतांना शेतकऱ्यांना मात्र ८० हजार रुपये एकर प्रमाणे अल्प मोबदला देण्यात आला. दर काढताना भूसपांदन कायदा २०१३ च्या कलम २६ ब नुसार कारवाई करण्यात आली नाही. तसेच २०१३ च्या भूसंपादन कायदा कलम २४ प्रमाणे कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे डोळेझाक करुन शेतकऱ्यांवर अन्याय केला. तसेच अल्प मोबदला देवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. कोसरा-सोमनाळा उपवितरिकेचे काम करण्यासाठी टेकेपार विभागातील सहायक अभियंता किशोर दमाहे पोकलॅड मशीन घेवून नवेगाव शेत शिवारात गेले. त्यावेळी उत्तम चौधरी या शेतकऱ्यांचे काम करण्यास मज्जाव केला. अधिकारी व शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. जोपर्यंत या प्रकरणाचा निर्वाळा होत नाही. तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, अशा पावित्र्यात शेतकरी असतांना उत्तम चौधरी याने खोदकाम करीत असलेल्या पोकलॅड मशीनला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन अड्याळ येथे करण्यात आली. तक्रारीवरुन अड्याळ पोलिसांनी उत्तम चौधरी यांना अटक केली. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने उपवितरीकेसाठी संपादीत केलेल्या जमिनीचा अल्प मोबदला देवून श्ोतकऱ्याची फसवणूक केली. सदर प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत उपवितरिकेचे काम करु देणार नाही. असा पवित्रा पिडीत शेतकऱ्यांनी घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादीत करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी मोबदला उचलला तर काहीनी मोबदला उचलला नाही. त्यामुळे सदर उपवितरिकेच्या काम गेल्या दोन वर्षापासून संथगतीने सुरु आहे. कामावर अभियंता ऐवजी कंत्राटदाराचे हुकूमशाहीत कामे सुरु आहेत. २०१३ च्या कायद्यनुसार शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी मागणी उत्तम चौधरी, वसंत गणपत चौधरी, शेवंता डोमा कोहपरी, शामराव आरीकर, राजीराम विश्वनाथ कोहपरे, योगीराज मेश्राम, धर्मा कोहपरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पोकलॅन्ड जाळण्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 27, 2017 00:33 IST