व्हॅनसह चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: September 27, 2015 00:30 IST2015-09-27T00:30:31+5:302015-09-27T00:30:31+5:30

एखाद्या हिंदी चित्रपटाची कहाणी शोभेल अशी घटना तुमसरात घडली आहे.

Trying to burn the driver with the van alive | व्हॅनसह चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

व्हॅनसह चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

खैरलांजी येथील घटना : मारेकऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल
तुमसर : एखाद्या हिंदी चित्रपटाची कहाणी शोभेल अशी घटना तुमसरात घडली आहे. रात्रीच्या सुमारास परतीच्या मार्गावर असताना रस्त्यावर मारुती व्हॅन उभी असल्याचे पाहून अज्ञात चार इसम मुखवटे बांधून दुचाकीने येताच वाहन चालकावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला वाहनात बसवून सीट बेल्टने बांधून वाहनाला पेटवून वाहन रस्त्याच्या कडेला खाईत ढकलून दिले. त्यानंतर मारेकरी पसार झाले.
दरम्यान, काही वेळातच चालकाला शुद्ध आल्याने तो गाडीबाहेर निघाला. ही घटना तुमसर तालुक्यातील खैरलांजी येथील काळा गोटा पुलाजवळ शुक्रवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. फरहान सलीम कुरैशी (२३) रा.हरदोली (सिहोरा) असे या जखमी वाहन चालकाचे नाव आहे. रोजगारासाठी फरहानला वडिलांनी मारुती व्हॅन एम.एच. ३६ - ४५३९ घेऊन दिली. काही दिवसांपासून वाहनात बिघाड आल्याने दुरुस्तीसाठी फरहान वाहन घेऊन शुक्रवारी सायंकाळी हरदोली येथून तुमसरकडे निघाला. शुक्रवारला दुकाने बंद असल्यामुळे तो तुमसरहून हरदोलीकडे परत जाताना डोंगरला येथे गणेशोत्सव मंडळात नृत्य कार्यक्रम सुरु असल्याने त्याने वाहन रस्त्याच्या कडेला लावून कार्यक्रम पाहत राहिला. रात्री १० वाजता जाताना काळा गोटा पुलानजीक वाहन पंक्चर झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला लावून टायर बदलविले. तितक्यात तीन दुचाकीने तोंडावर मुसके बांधलेले चार इसमांनी लोखंडी रॉडने बेशुद्ध होईस्तोवर त्याला मारले. बेशुद्ध अवस्थेतच मारूती व्हॅनसह रस्त्याच्या लगतच्या खाईत ढकलले. त्यानंतर वाहनाला आग लावली. दरम्यान, काही वेळातच फरहानला शुद्ध आल्यानंतर गाडीबाहेर निघाला. हरदोली येथील प्रकाश पारधी या मित्राला भ्रमणध्वनीवरुन हकीकत सांगितला. काही वेळातच फरहानचे वडील व पारधी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती तुमसर पोलिसांना दिली. पोलीस येईपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी भादंवि ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास एपीआय ए.एम. जाधव करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Trying to burn the driver with the van alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.