उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावे
By Admin | Updated: June 12, 2017 00:32 IST2017-06-12T00:32:17+5:302017-06-12T00:32:17+5:30
शासनाने सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल,

उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावे
निमचंद्र चांदेवार : २५ गावात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी योजनेची सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : शासनाने सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, याचे नियोजन केले आहेत. यासाठी शासन कामाला लागले आहे. शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्व कामे नियोजनात समाविष्ट करण्यात आली असल्याचे प्रतिपादन करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी केले.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत जांभोरा गावात रोजगार हमी योजनेच्या कामावर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. लोकसहभागातून ही कामे यशस्वी करण्याचा मानस शासनाचा आहे. त्यासाठी करडी परिसरातील २५ गावात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत विविध ठिकाणी सभांचे आयोजन करून जनजागृती केली जात आहे. दरवर्षी सन २०२१-२२ पर्यंत अशा सभा घेतल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नरत व्हावे, कृषी विभागाची मदत घ्यावी असे प्रतिपादन करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी यावेळी केले.
उपरोक्त योजनेअंतर्गत खडकी, बोंडे, ढिवरवाडा, डोंगरदेव, मुंढरी बु., मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, नरसिंगटोला, देव्हाडा खुर्द, देव्हाडा बुज, जांभळापाणी, मोहगाव, नवेगाव, करडी, दवडीपार, कान्हळगाव, पांजरा, बोरी, बोरगाव, पालोरा, केसलवाडा, लेंडेझरी,जांभोरा, किसनपूर आदी २५ गावात कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, कृषी सहाय्यक वाडीभस्मे, यादोराव बारापात्रे, निखारे, कृषी मित्र यांच्या सहाय्याने या सभा घेण्यात आल्या.
सभांना मार्गदर्शन करण्यात आले. मृग नक्षत्रामध्ये करावयाच्या कामांची माहिती देण्याबरोबर, मशागतीचे तंत्र, बि बियाण्यांची निवड करण्याच्या पद्धती, पेरणीपूर्व मशागत, बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया, खते, पाणी व कीटकनाशकांच्या आवश्यकतेनुसार वापर आदी व अन्य बाबींवर सविस्तर मार्गदर्शन या वेळी शेतकऱ्यांना करण्यात आले.
पीकविमा योजना, मागेल त्याला शेततळे, बोडी, पिकांची पूर्व मशागती पासून ते पीक काढणी, मळणी पर्यंतचा मजुरीवर खर्च, खर्च कमी करणे, शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर, गोपीनाथ मुंडे अपघात विमा आदी बाबतही मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. सभा ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर, रोहयो कामावर घेण्यात आल्या. या सभेत मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी कामाचे नियोजन करेल असा विश्वास व्यक्त होत आहे. सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.