‘विश्वासू’नेच केला वृद्धेचा खून
By Admin | Updated: June 13, 2015 00:44 IST2015-06-13T00:44:16+5:302015-06-13T00:44:16+5:30
पंधरा दिवसांपुर्वी तालुक्यातील साखरा येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाला होता.

‘विश्वासू’नेच केला वृद्धेचा खून
प्रकरण साखरा येथील खूनाचे : मारेकऱ्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी
लाखांदूर : पंधरा दिवसांपुर्वी तालुक्यातील साखरा येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाला होता. पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करूनही मारेकऱ्याचा शोध लागत नव्हता. अखेर पोलीस यंत्रणा कामाला लागली अन् मृतक महिलेचा खास विश्वासू व्यक्तीच खुनी असल्याचे तपासाअंती उघड झाले. आरोपीला अटक केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
जमना श्रावण शहारे (६५) रा. साखरा असे मृतक महिलेचे नाव असून वसंता गणपत भांडरकर (५३) रा. साखरा असे मारेकऱ्याचे नाव आहे. वसंता भांडरकर हा जमनाबाईचा आर्थिक व्यवहार ते सांगितलेली सर्व कामे तो निमुटपणे करायचा. जमनाबाईला अपत्य नसल्याने ती वसंताच्या विश्वासावरच अवलंबून होती. १० वर्षापुर्वी जमनाबाईचे पती मृत पावल्याने वसंताकडूनच सर्व कामे करवून घ्यायची. काही दिवसापासून वसंताने जमनाला पैशाची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. याचाच राग अनावर झाल्याने दि.२५ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वरवंट्याने तिच्या डोक्यावर वार करून ठार मारल्याची कबुली दिली. पंधरा दिवसापासून दिघोरीचे सहायक पोलीस निरीक्षक पी.जे. यादव खून प्रकारणाच्या शोधात होते. अनेकांना संशयावरून ताब्यात घेतले. मात्र खुनापर्यंत पोहोचू शकले नाही. आरोपीच्या हालचाली व कागदपत्रावरून संशय बळावला. या आधारावर आरोपीचे घराची झडती घेतली असता गाईच्या गोठ्यात जमिनीत १५ हजार ७२० रूपये आढळून आले. रक्ताने भरलेले कपडेही जप्त करण्यात आले. त्याने पोलिसापुढे गुन्हा कबूल केला. पंधरा दिवसापासून तपास लागला नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे यांनी घटना स्थळाला भेट देवून तपासाची दिशा दिली. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. लाखांदूर दिवाणी न्यायालयात हजर करून पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. पोलीस निरीक्षक यादव, प्रकाश तलमले, शिपाई प्रमोद बागडे, पुराम, बुरडे, गुलाब घासले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)