नळयोजना ठरली कुचकामी
By Admin | Updated: June 13, 2015 00:41 IST2015-06-13T00:41:48+5:302015-06-13T00:41:48+5:30
बरबसपुरा गावात सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली.

नळयोजना ठरली कुचकामी
तांत्रिक विभागाचे दुर्लक्ष : सात वर्षानंतर पूर्णत्वास येऊनही नळयोजना बंद
काचेवानी : बरबसपुरा गावात सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली. पाण्याच्या समस्येकरिता विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसात या नळ योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नाही. तांत्रिक विभागाचे दुर्लक्ष व कंत्राटदाराचा हलगर्जीपणा ही नळयोजना कुचकामी ठरण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात ेयेत आहे.
बरबसपुरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत सन २००६-०७ मध्ये ४४ लाख रूपयांच्या खर्चाने तयार करण्याकरिता नळयोजना मंजूर करण्यात आली होती. या नळ योजनेचे भूमिपूजन तत्कालीन आ. राजेंद्र जैन व दिलीप बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नळ योजनेच्या कामाला सुरूवातीपासूनच अवकळा लागली होती. प्रारंभी या योजनेचे कंत्राट गोंदियातील कंत्राटदारांना दिले होते. त्यांनी अर्धवट काम करून ठेवले होते.
काही महिन्यांनी हे काम स्वत:ला कर्तव्यदक्ष समजणाऱ्या नागपूरच्या राऊत नामक कंत्राटदाराला देण्यात आले. त्यांनी सदर काम तीन ते चार वर्षांत पूर्णत्वाकडे नेले. आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१४ मध्ये टाकीत पाणी घालून नळ योजनेतून गावकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गावातील कोणत्याही नागरिकांना नळ योजनेच्या पाण्याची योग्य सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.
बरबसपुरा येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवसापासून नळाला पाणी सोडण्यात आले, तेव्हा काही निवडक घरांना १० ते १५ गुंड पाणी मिळाले. काही घरी चार ते पाच गुंड पाणी तर काही घरी नळाचे पाणीच पोहोचले नाही. नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाणी देण्यास सात ते साठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी निम्म्या गावाला सतत पंधरा दिवस पाणी उपलब्ध झालेले नाही.
सद्यस्थितीत नळ योजना ठप्प पडलेली आहे. काही नागरिकांनी लोकमतला सांगितले की, या नळयोजनेतून पिण्याचे पाणी वाटप केले जात आहे. ते पाणी पिण्या योग्यच नाही. काही दिवस गढूळ पाणी नळाव्दारे आले. गावात १८० पेक्षा अधिक कुटुंबीयांनी नळ कनेक्शन घेतले. मात्र नळाचे पाणी अर्ध्या लोकांना मिळत नाही, असे सरपंच ममता लिचडे यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, कंत्राटदरांनी काम पूर्ण केले नसल्याने एम.बी. रोकण्यात आले आहे. एम.बी. करिता कंत्राटदार राजेश राऊत तगादा लावत असले तरी काम पूर्ण केल्याशिवाय एम.बी. देण्यात येणार नाही.
नरेंद्र मेश्राम यांच्या घरी नळाला पाणी येत नव्हते. मात्र बाजूला असणाऱ्या अनुसया मोटघरे आणि जावरकर यांच्या घरी नळाला पाणी येत होते. यासंबधी कंत्राटदार राजेश राऊत यांना बोलले असता, माझे काम झाले, आता तुम्ही पाहा. कदाचित भूत लागल्याने बंद पडले असेल, असे उध्दटपणाचे उत्तर राजेश राऊत यांनी दिल्याचे सरपंच लिचडे यांनी सांगितले. कार्य करण्याचा कालावधी लांब-लचक असल्याने नळ योजनेचा लाभ गावकऱ्यांना उत्तमप्रकारे मिळेल किंवा कंत्राटदार देणार, अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा पूर्णत: भंग पावली आहे. (वार्ताहर)
सर्वांना मलाई, नागरिकांना फुटकी घागर
बरबसपुरा नळयोजनेच्या कामाला सात वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. परंतु त्याचा लाभ ग्रामस्थांना होत असल्याचे दिसून येत नाही. नळयोजनेच्या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने निधी उकळण्याकरिता कसे-बसे काम केले. अधिकारी व ग्रामपंचायतने टक्केवारी घेतली. अर्थात सर्वांनी मलाई खाल्ली. मात्र योजनेचा लाभ नागरिकांना मिळणे गरजेचे असताना मिळत नाही. नळ योजनेच्या कामाकडे ग्रामपंचायतने जातीने लक्ष दिले नाही व राऊत नामक कंत्राटदाराने चांगल्या बुध्दीने काम केले नाही, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ऐकूनही घेतले नाही. त्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे. नळयोजनेच्या कामाची मलाई कंत्राटदारासह अधिकारी-पदाधिकाऱ्यांना मिळाली. परंतु सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना काय मिळाले? केवळ फुटकी घागर!
कंत्राटदाराचा हलगर्जीपणा
सरपंच ममता लिचडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे २०१५ रोजी ग्रामपंचायतमध्ये आमसभा झाली. नळ योजनेचे पंप सुरू करण्याकरिता लोकांच्या सहमतीने पंचनामा करून मोटार सुरू करण्यासाठी गेले असता मोटारचे कनेक्शन कंत्राटदार राजेश राऊत यांनी काढून ठेवले होते, जेणेकरून कितीही प्रयत्न केल्यावर मोटार सुरू होणार नाही. मोटार सुरू न होण्याचे कारण मोटार जळाल्याचे उत्तर देण्यात आले. नंतर दोन दिवसात त्याच स्थितीत कंत्राटदाराच्या माणसांनी सुरू केले. सद्यस्थितीत पाणी पुरविण्याची व्यवस्था कंत्राटदाराकडे आहे. पाणी सुरू करून काही तासातच बंद करुन उरलेले पाणी दुसऱ्या दिवशी कमी प्रमाणात दिल्या जाते. त्यामुळे नळ योजना कुचकामी ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
पाणी साठ्याची जागा आणि पाण्याच्या टाकीची उंची कमी असल्याने तसेच घरी नळ लावताना दक्षता न घेतल्याने नळयोजना अयशस्वी ठरत आहे. आतापर्यंत गावकऱ्यांना नळाचे पाणी योग्यरीत्या मिळाले नसून योजना सध्या बंद पडून आहे. अदानी पॉवरकडून बोअर करण्यात आले असून लवकरच टाकीत पाणी येण्याची व्यवस्था करण्यात येईल.
ममता लिचडे, सरपंच,
ग्रामपंचायत, बरबसपुरा (तिरोडा)