विजयामुळे आनंदाश्रूने डोळे पाणावले

By Admin | Updated: October 19, 2014 23:17 IST2014-10-19T23:17:40+5:302014-10-19T23:17:40+5:30

तुमसर विधानसभा मतदार संघात आज मतमोजणीचा आलेला निकाल भविष्यातील राजकीय फेरबदलाचे संकेत म्हणावे. रविवारी सकाळपासून मतमोजणीची प्रचंड उत्कंठा उमेदवारासह मतदारांमध्ये होती.

The triumph of eyes and eyes | विजयामुळे आनंदाश्रूने डोळे पाणावले

विजयामुळे आनंदाश्रूने डोळे पाणावले

अनपेक्षित पण प्रचंड मताक्य : भाजपने काढले मागील पराभवाचे ऊट्टे
तुमसर : तुमसर विधानसभा मतदार संघात आज मतमोजणीचा आलेला निकाल भविष्यातील राजकीय फेरबदलाचे संकेत म्हणावे. रविवारी सकाळपासून मतमोजणीची प्रचंड उत्कंठा उमेदवारासह मतदारांमध्ये होती. विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावर नवनियुक्त आमदार चरण वाघमारे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. या आनंदाश्रूंना त्यांनी वाट मोकळी केली असता उपस्थित कार्यकर्त्यांचेही हृदयाची ढोके मंदावली.
भाजपचे उमेदवार चरण वाघमारे यांनी २८ हजार ४४८ मतांची प्रचंड आघाडीसह विजयी संपादन केला. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळच्या सत्रात सुरूवात होण्यापुर्वी उमेदवार, समर्थकांच्या हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढत होते. चेहरे हिरमुसलेले, विजयाबद्दल साशंकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. पुढच्या क्षणाला काय होईल, असे धीर गंभीर वातावरण मत मोजणी केंद्रावर दिसत होते. प्रथम फेरी मतमोजणीच्या सुरूवातीची घोषणा मुख्य निरीक्षकांनी केल्यावर ईव्हीएम मशीनचे बीप वाजले. त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींचे डोळे ईव्हीएम मशीनकडे लागले. मतदान केंद्र क्रमांक एक वर भाजप १६८, शिवसेना ११०, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ३३ व बसपा ३५ असे खाते उघडले. भाजप प्रतिनिधींचे डोळे आनंदाने तराळले. त्यांनी एकमेकांकडे हातवारे करून विजयी खूण दाखविली.
शिवसेनेने तिसऱ्या, पाचव्या, सहाव्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने दहाव्या फेरीत मताधीक्य घेतल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र या आशा क्षणभंगुर ठरल्या. पुढल्या फेऱ्यांमध्ये भाजपने एक हाती विजयी संपादन केल्याप्रती पुढील सर्व फेऱ्यांमध्ये मताधिक्य घेतले. तेराव्या फेरीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोलतासे व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषाला सुरूवात केली.
तुमसर मतदारसंघात पंचरंगी लढतीचे सुरूवातीलाच चित्र दिसत होते. पुढे ती त्रिकोनी झाली. यात भाजप, राकाँ व सेना यांच्या अटीतटीची चुरस निर्माण झाली होती. तुमसर शहर, तालुका व मोहाडी तालुका कुणाच्या पारड्यात मते टाकेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. प्रथमच तुमसर बाहेरचा उमेदवार येथे निवडून आला आहे. राकाँने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राकाँने भाजपचे माजी आमदार मधूकर कुकडे यांना तिकीट देऊन चुरस निर्माण केली होती. तर सेनेकडून किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांना मैदानात उतरविले होते.
नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे यांची तुमसर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. साध्या वेशात असलेल्या आमदार वाघमारे यांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित हास्य त्यांचा आनंद गगणात मावत नसल्याने सांगत होते. मिरवणुकीतून त्यांनी सर्वांचे अभिवादन स्विकारले. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान मतमोजणी केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याने चरण वाघमारे यांना विजयी झाल्याची घोषणा करून प्रमाणपत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले जिल्हा परिषद सभापती संदीप टाले यांनी वाघमारे यांना मिठी मारली. तेव्हा आनंदाश्रूंनी त्यांचे डोळे पाणावल्याने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या प्रसंगाने उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनात आनंद द्विगुणीत झाला. विजयी मिरवणुकीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सभापती संदीप टाले, तारिक कुरैशी, प्रदीप पडोळे, सभापती कलाम शेख, गीता कोंडेवार, निर्मला कापसे, खेमराज गभणे, प्रमोद घरडे, गजल शर्मा, अनिल जिभकाटे, अमित चौधरी यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The triumph of eyes and eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.