आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे होणार स्थलांतरण
By Admin | Updated: September 6, 2015 00:26 IST2015-09-06T00:26:02+5:302015-09-06T00:26:02+5:30
शासनाने भंडारा येथील आदिवासी विकास प्रकल्प बंद करण्याचा निर्णय २ सप्टेंबर रोजी घेतला. पूर्वीसारखे हे कार्यालय देवरी येथे स्थानांतरण करण्यात येत आहे.

आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे होणार स्थलांतरण
अन्याय : भंडारा-गोंदियाचे संयुक्त कार्यालय देवरीत होण्याच्या हालचाली
तुमसर : शासनाने भंडारा येथील आदिवासी विकास प्रकल्प बंद करण्याचा निर्णय २ सप्टेंबर रोजी घेतला. पूर्वीसारखे हे कार्यालय देवरी येथे स्थानांतरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आदिवासींना पायपीट करावी लागणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भाजपच्या आदिवासी विकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवून स्थलांतरण न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील पाच वर्षापूर्वी भंडारा मुख्यालयी आदिवासी प्रकल्प कार्यालय स्वतंत्रपणे सुरु करण्यात आले. पूर्वी भंडारा व गोंदियाचे संयुक्त कार्यालय गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे होते. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना सुमारे १५० ते १६० किमी लांब देवरी येथे शासकीय कामासाठी जावे लागत होते. अनेक योजनांपासून ते वंचित राहत होते. त्या अनुषंगाने, भंडारा जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र कार्यालय चार वर्षापुर्वी सुरु करण्यात आले.
आदिवासी विकास विभागाचे एका पत्रान्वये भंडारा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धा येथे स्थलांतरीत करण्याची बाब विचाराधीन असून जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालय पूर्वीप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सन २००१ च्या जणगणनेनुसार आदिवासींची संख्या ९८ हजार होती. यात माना समाजाला २००३ मध्ये आदिवासीत समाविष्ट केले. सन २०११ मध्ये आदिवासींची जनगणनेत ८९ हजारसंख्या दर्शविली आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे भंडारा मुख्यालयापर्यंत अंतर ५० ते ६० किमी आहे.
उलट देवरीला कार्यालय सलग्नीत केल्यास १५० ते १६० किमीच्या वर आहे. हे आर्थिक, मानसिक व शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरणार आहे. याकरिता हजारो आदिवासी बांधक रस्त्यावर उतरणार असून शासनाच्या निषेध करणार आहे. असा इशारा भाजपा आदिवासी आघाडी भंडारा जिल्हाध्यक्ष अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दामू धुर्वे, नरेंद्र मडावी, राजकुमार परतेती, मुकेश भलावी यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)