वृक्ष लागवड सामाजिक चळवळ व्हावी
By Admin | Updated: June 15, 2017 00:23 IST2017-06-15T00:23:56+5:302017-06-15T00:23:56+5:30
भविष्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे. भूगर्भात तीव्र जलसंकटांची चाहूल लागली आहे.

वृक्ष लागवड सामाजिक चळवळ व्हावी
संजय आयलवार यांचे प्रतिपादन : ७.६८ कोटी वृक्ष लागवडीचे लक्षांक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भविष्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे. भूगर्भात तीव्र जलसंकटांची चाहूल लागली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करावे लागणार आहे. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी सगळ्यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून चळवळ उभारावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी केले.
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची सभा लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सभेला सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, उपशिक्षणाधिकारी हेमंत भोंगाडे, लालबहादूर शाळेचे प्राचार्य डी.व्ही. देशमुख, मयूर लेदे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात २६६ शाळा आहेत. यात खासगी व्यवस्थापनाच्या २०६, जिल्हा परिषद ३२, नगरपरिषद ६, माजी शासकीय दोन अशा शाळांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २८ शाळांना २० जूनपर्यंत वृक्ष लागवडीसाठी २५ खड्डे खोदावयाचे आहेत. शाळांनी खड्डे खोदले काय याचे सर्वेक्षण केले जाणार आहेत. तसेच खड्डे खोदले असल्याची नोंद करून शाळांना शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करायचे आहे. तसेच उर्वरीत १७७ खासगी शाळांनी प्रत्येकी १० खड्डे खोदावयाचे आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांनी वृक्षदिंडी काढावी, तसेच २७ ते २९ जून या काळात निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन या विषयावर घेण्यात याव्यात.
वृक्षांची जोपासना करणाऱ्यासाठी लोकसहभागातून संरक्षक कठडे लावण्यासाठी प्रयत्न करावी असे संजय आयलवार यांनी सांगितले. तसेच १ ते ७ जुलै हा वृक्षलागवड सप्ताह आहे. या सप्ताहात गावातील माजी सैनिक तसेच एखादा सुटीवर आलेला फौजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करावे. तसेच वृक्षसंवर्धनाचे संस्कार जोपासण्यासाठी वृक्ष रक्षाबंधनाचा उपक्रम शाळांनी हाती घ्यावी असेही त्यांनी सांगितले. वृक्ष लागवड कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी तुमची साथ हवीय अशी भावनीक सादही संजय आयलवार यांनी घातली. तसेच यावेळी सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर यांनी यावर्षी ७.६८ वृक्ष लागवडीचे लक्षांक पूर्ण करायचे आहे. त्यासाठी सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षकांनी वैयक्तिक नोंदणी करावी. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. प्रत्येक शाळांनी आॅनलाईन नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे असे सांगितले. वृक्षलागवड वनविभागापुरता नव्हे त्याची लोकचळवळ करण्यासाठी काम करा असेही सांगितले. आतापर्यंत ६२ हजार हरितसेनेची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली. शाळा मुख्याध्यापकांनी नोंदणी कशी करावी याची माहिती देण्यात आली. वृक्ष आपल्या दारी या उपक्रमासाठी रोपांच्या मागणीसाठी विभागीय कार्यालय भंडारा येथे २५ जून पर्यंत शाळा, संस्था, वैयक्तिकपणे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुकास्तरावर हरित सेनेत सहभाग करून घेण्यासाठी शिबिर लावण्यात आले आहेत.
नोंदणीसाठी भंडारा येथे १५ जून, मोहाडी १६ जून, साकोली २० जून, लाखांदूर २२ जून, तुमसर १७ जून, पवनी २३ जून व लाखनी १९ जून अशा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. वृक्ष लागवड या विषयासह प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर उपशिक्षणाधिकारी हेमंत भोंगाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण विभागाकडून आलेल्या परिपत्रकाची माहिती दिली.