वृक्ष लागवड योजनेचा पैसा पाण्यात
By Admin | Updated: April 25, 2016 00:25 IST2016-04-25T00:25:58+5:302016-04-25T00:25:58+5:30
ज्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते त्या प्रमाणात मात्र वृक्षांची लागवड होत नाही. असाच दृष्टिकोन बदलण्याचा हेतूने शासनाने सुरु केलेली शतकोटी वृक्ष लागवड योजना

वृक्ष लागवड योजनेचा पैसा पाण्यात
वृक्षांची देखभाल अधांतरी : जंगल शिवारातील हरितक्रांतीचे स्वप्न भंगले
भंडारा : ज्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते त्या प्रमाणात मात्र वृक्षांची लागवड होत नाही. असाच दृष्टिकोन बदलण्याचा हेतूने शासनाने सुरु केलेली शतकोटी वृक्ष लागवड योजना जिल्ह्यात अधोगतीला आली आहे. हजारो झाडे लावण्यात आली असली तरी देखभाल अभावी ही झाडे नेस्तनाबूत झाली असून कोट्यवंधीचा निधी पाण्यात गेला आहे. परिणामी जिल्ह्यातील जंगल शिवारात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्णत: धुळीला मिळाले आहे.
जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांपैकी जवळपास ६० टक्के झाडे नष्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वृक्ष संगोपनाची व संवर्धनाची ज्या यंत्रणेची जबाबदारी होती, त्या विभागाचा अक्षम्य दुर्लक्षपणा या योजनेच्या अधोगतीला कारणीभूत ठरलेला आहे.
मागील पावसाळ्यात लागवड करण्यात आलेली झाडे वाढता उष्णतामानामुळे वाळत चाललेली आहे. त्यामुळे त्यावेळी लक्षावधींचा झालेला खर्च पाण्यात जाणार काय, असा सवाल गावकरी विचारु लागले आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शतकोटी वृक्ष लागवड ही योजना अंमलात आणल्या गेली होती.
या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय, शाळा व इतर विभागांना जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचे आदेश देण्यात आले होते.
तसेच एक निश्चित उद्दिष्ट ही डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवायची होती. वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र जी झाडे लावण्यात आली. त्यांचे संगोपन झाले नाही. लागवडीपैकी ५० ते ६० टक्के झाडे नष्ट झाली आहेत, अशी माहिती आहे.
या झाडांना संजीवणीची गरज आहे. योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुतर्फाही मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. लावण्यात आलेल्या झाडाना उन्हाळ्यात पाण्याची गरज आहे.
शतकोटी योजनेच्या अंतर्गत लावण्यात आलेली झाडे नष्ट होऊन यावर खर्च झालेला कोट्यवधींचा निधी मातीमोल ठरणार एवढे संकेत स्पष्ट दिसत आहेत. (प्रतिनिधी)