शहरातील दुभाजकावरील वृक्ष दिसेनाशी!
By Admin | Updated: July 5, 2016 01:04 IST2016-07-05T01:04:57+5:302016-07-05T01:04:57+5:30
राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम १ तारखेलाच पार पडला. परंतु नगर पालिकेने महिनाभरापूर्वी रस्ता दुभाजकावर झाडे

शहरातील दुभाजकावरील वृक्ष दिसेनाशी!
इंद्रपाल कटकवारल्ल भंडारा
राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम १ तारखेलाच पार पडला. परंतु नगर पालिकेने महिनाभरापूर्वी रस्ता दुभाजकावर झाडे लावून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु या झाडांचे योग्य ते संवर्धन न झाल्यामुळे बहुतांश ही झाडे सुकलेली आहेत. अशाही स्थितीत दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पालिका प्रशासनाने मात्र स्वत:चा उदोउदो करून घेतल्याचे चित्र आहे.
भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखावर आहे. ‘स्वच्छ शहर - सुंदर शहर’ अशी भंडारा नगरपालिकेची संकल्पना आहे. या शहरात मुख्य रस्ते मोठे आहेत. त्यात महात्मा गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक, त्रिमूर्ती चौक ते लायब्ररी चौक, लायब्ररी चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, गांधी चौक ते शास्त्री चौक, शास्त्री चौक ते राजीव गांधी चौक आणि राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौक असे मोठे रस्ते आणि चौक आहेत. या रस्त्यावर दुभाजक तयार करण्यात आले आहेत. त्यात झाडेही लावण्यात आली आहेत. त्या झाडांना दररोज पाणी देण्यात आले असते आणि योग्य त्याप्रकारे संवर्धन झाले असते तर ही झाडे जिवंत असती. बहुतांश झाडे वाळलेली असून देखरेखीअभावी उर्वरित झाडेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात ही झाडांना ‘टॉनिक’ मिळाले, असते परंतु दुर्दैवाने असे झाले नाही. सद्यस्थितीत नगरपालिका प्रशासनाने रस्ते विकासकामांचा सपाटा लावला आहे. या सपाट्यात लावलेल्या झाडांचेही संगोपन व्हावे, ही अपेक्षा आहे. शहरात ३२ नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकांनी स्वत:चा वॉर्ड दत्तक घेऊन वृक्ष लागवड केली असती तर हे शहर हिरवेगार झाले असते. परंतु राज्य शासनाचा उपक्रम आल्यानंतर झाडे लावून त्यात भर घालण्यासोबतच हा उपक्रम पूर्वीच राबविला असता तर कदाचित ‘भंडारा पॅटर्न’ राज्यात राबविला गेला असता.