दीड वर्षाच्या काळात सात बीडीओंचा प्रवास
By Admin | Updated: January 31, 2017 01:20 IST2017-01-31T01:20:20+5:302017-01-31T01:20:20+5:30
या पंचायत समितीच्या कारभाराला प्रभारी कार्यभाराची लागण झाली आहे. याना त्या कारणावरून कार्यभार

दीड वर्षाच्या काळात सात बीडीओंचा प्रवास
आज रूजू झाले नियमित बीडीओ : शेवटचे कृष्णा मोरे दीड वर्षासाठीच
मोहाडी : या पंचायत समितीच्या कारभाराला प्रभारी कार्यभाराची लागण झाली आहे. याना त्या कारणावरून कार्यभार काढला जातो, दिला जातो. त्यामुळे मागील दीड वर्षात सात अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी म्हणून मोहाडी पंचायत समितीत प्रवास केला आहे.
मोहाडभ पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांवर चालत होती. सप्टेंबर २०१५ ला पंकज भोयर यांची भेट नियुक्ती गटविकास अधिकारी म्हणून करण्यात आली होती. त्यांची ती प्रथम नियुक्तीची सुरूवात मोहाडी पंचायत समितीमधून कायम गटविकास अधिकारी म्हणून झाली होती. थेट नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या कामाचा अंदाज वेगळा होता. काही नेत्यांना त्यांचा कारभार पसंत पडला नाही. नंतर पंकज भोयर यांना फटाके लावण्यात आले. अखेर त्यांची बदली करूनच राजकारणी नेते स्वस्थ बसले. त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी गजानन लांजेवार यांना २६ मे रोजी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार देण्यात आला. पाच महिन्यानंतर गजानन लांजेवार अर्जित रजेवर गेले. त्याचा कार्यभार प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कृषी अधिकारी रविंद्र वंजारी यांच्याकडे सोपविण्यात आले. वीस दिवस गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे रविंद्र वंजारी यांनी परत आपल्या मुळ आस्थावनेवर गेले व त्यांच्या जागी पुन्हा प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून गजानन लांजेवार रूजू झाले. तथापि, पुन्हा गटविकास अधिकारी पदावर रूजू झालेले गजानन लांजेवार यांना केवळ तेरा दिवसच त्या खुर्चीवर ठेवण्यात आले. जाणिवपूर्वक गजानन लांजेवार यांना प्रभारी गटविकास अधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याचा कारभार मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांनी केला होता. आदेश येण्यापूर्वीच सीटीसी भरून कार्यभार सोडण्याचा प्रकार करण्यात आला होता. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच नवीन प्रभारी गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर यांचा आदेश येवून धडकला होता. या भानगडीत एक आठवडा विना गटविकास अधिकाऱ्या अभावी पंचायत समिती चालविण्यात आली होती. तुमसरचे सहायक गटविकास अधिकारी असलेले मनोज हिरूडकर २६ नोव्हेंबर रोजी मोहाडी पंचायत समितीला रूजू झाले. त्यांनी २४ जानेवारीपर्यंत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यभार सांभाळला. पण, त्यांची पदोन्नती खंडविकास अधिकारी म्हणून देवरी देथील पंचायत समितीला करण्यात आली. तेही मोहाडीतून निघून गेले. त्यानंतर त्याच दिवशी भंडारा येथील एमआरईजीएसचे बीडीओ एम.ई. कोमलवार यांनी मोहाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. पण, त्यांचही दुर्देव आज ३० जानेवारी रोजी त्यांना भंडारा येथे परत जावे लागले. गडचिरोली येथून प्रकल्प सहायक पदावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत काम करणारे कृष्णा मोरे यांना बढती मिळाली. येथील पंचायत समितीमध्ये नियमित गटविकास अधिकारी म्हणून कृष्णा मोरे यांनी कार्यभार स्विकारला आहे. दीड वर्षानंतर मोहाडी पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी मिळाला आहे. तथापि, ते पुढील दीड वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुन्हा दीड वर्षानंतर प्रभारी अधिकारी पदाची टांगती तलवार मोहाडी पंचायत समितीवर राहणार आहे. सेवानिवृत्तीचा काळ सुखाचा जावा यासाठी ते काही दिवस सुटीत काढतील. पुन्हा तेच प्रभारी अधिकाऱ्यांचा कार्यभार बघायला मिळणार असल्याची चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)