रेल्वेतून गांजाची तस्करी
By Admin | Updated: July 15, 2015 00:34 IST2015-07-15T00:34:56+5:302015-07-15T00:34:56+5:30
तुमसर शहर व तालुक्यात परराज्यातून तस्करीच्या गांज्याची खेप मागील अनेक महिन्यांपासून नियमित येत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

रेल्वेतून गांजाची तस्करी
परराज्यातून वाहतूक : मटका व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई
तुमसर : तुमसर शहर व तालुक्यात परराज्यातून तस्करीच्या गांज्याची खेप मागील अनेक महिन्यांपासून नियमित येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. याबाबत पोलीस प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. सोमवारी तुमसर पोलिसांनी मटका व्यवसायीकांवर कारवाई केल्याची माहिती आहे. मटक्याचा व्यवसाय दोन दिवसापासून बंद आहे.
तुमसर तालुक्याच्या सीमा मध्यप्रदेशाला भिडल्या आहेत. तुमसर कटंगी व तुमसर वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गाने तथा छत्तीसगड राज्यातून रेल्वेने तस्करीचा गांजा शहर व तालुक्यात आणला जातो. येथे एक रॅकेट सक्रीय असल्याचे समजते. गांज्यांचे मुख्य केंद्र गोंदिया व बालाघाट असल्याची माहिती आहे. तेथून हा गांजा तुमसर, भंडारा, नागपूर येथे पाठविण्यात येतो. रेल्वे मार्गाने गांजा आल्यावर त्याची तपासणी होत नाही, पंरतु राज्य महामार्गाने गांजा कसा येतो? हा प्रश्न मुख्य प्रश्न आहे.
तुमसर शहरात गांजा चिल्लर विक्री होत असल्याची माहिती आहे. परंतु मोठी खेप नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, पंरतु गांजा नेमका कुठून व कोण आणतो याचा शोध घेण्याची येथे गरज आहे. गांजा हे मादक पदार्थ असून गृहविभागाची करडी नजर त्यावर निश्चित असते. अधिकाऱ्यांनी या रॅकेटचा शोध घेतल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
तुमसर पोलिसांनी सोमवारी मटका व्यावसायीकांवर कारवाई केल्याची माहिती आहे. नविन उपविभागीय पोलीस अधिकारी चार दिवसापूर्वी रुजू झाले त्यांनी आपल्या कार्याची चूणूक दाखविली. शहरातील मुख्य चौकाचौकात मटका व्यावसायीकांचे कार्य सुरु होते, परंतु सध्या ते भूमीगत झाले आहेत. येथे पोलीस विभागाने नियम व कर्तव्याचे विसर पडू देऊ नये अशी आशा सामान्य नागरिकांना आहे. (तालुका प्रतिनिधी)