परीविक्षाधीन नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: April 10, 2015 00:41 IST2015-04-10T00:41:15+5:302015-04-10T00:41:15+5:30
गौण खनिज वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडून दरमहा हप्ता वसूल करणाऱ्या लाखांदूर येथे कार्यरत परीविक्षाधीन नायब तहसिलदाराला आज गुरुवारला दुपारी ३.४० वाजता ...

परीविक्षाधीन नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
लाखांदूर : गौण खनिज वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडून दरमहा हप्ता वसूल करणाऱ्या लाखांदूर येथे कार्यरत परीविक्षाधीन नायब तहसिलदाराला आज गुरुवारला दुपारी ३.४० वाजता त्यांच्या कक्षात सेवानिवृत्त अव्वल कारकून विनायक बाळबुद्धे याच्यामार्फत चार हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
परीविक्षाधीन नायब तहसिलदार सागर कांबळे व विनायक बाळबुद्धे (६०) अशी आरोपींची नावे आहेत. सन २०१३ च्या बॅचचे कांबळे हे लाखांदूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून रूजू झाले. १८ महिन्याच्या परिविक्षाधीन कालावधी संपण्यासाठी १० दिवस शिल्लक असून त्यापूवीरच एसीबीच्या जाळ्यात अडकण्याची त्याच्यावर वेळ आली. बाळबुद्धे हे तहसील कार्यालयातून अव्वल कारकून पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. कामाचा अनुभव असल्यामुळे त्याला तहसील कार्यालयात मानधनावर ठेवण्यात आले होते.
बोथली नदीघाटावरून रेतीची वाहतूक करताना कांबळे यांनी तक्रारदाराला ५ एप्रिलला पकडले होते. त्यानंतर ट्रॅक्टर जप्त करुन नियमानुसार दंड आकारण्यात आला. त्यानंतर दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कांबळे यांनी तक्रारदाराला तहसील कार्यालयात बोलावून दरमहा पाच हजार रूपये देऊन गौण खनिज न्या, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार गुरुवारला दुपारी नायब तहसिलदार कांबळे यांच्या कक्षात विनायक बाळबुद्धे याच्यामार्फत चार हजार रूपये घेताना पथकाने पकडले. याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, जीवन भातकुले, अशोक फुलेकर, सचिन हलमारे, शेखर देशकर, गौतम राऊत, मनोज पंचबुद्धे, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, विनोद शोवणकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)