धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड
By Admin | Updated: November 1, 2014 22:48 IST2014-11-01T22:48:23+5:302014-11-01T22:48:23+5:30
सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी सुरू आहे. १५ दिवसांनी जड धानही कापणीला येणार आहे. त्यामुळे धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी डोक्यावरच्या कर्जफेडीसाठी धान

धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड
भंडारा : सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी सुरू आहे. १५ दिवसांनी जड धानही कापणीला येणार आहे. त्यामुळे धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी डोक्यावरच्या कर्जफेडीसाठी धान विक्रीला काढावे आणि दलालांनी आपली टोपी सावरावी, अशी स्थिती नेहमीच बघायला मिळते. त्यामुळे नुकत्याच धानाच्या खरेदीसाठी व्यापारी टपून बसले आहेत.
यावर्षी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांनी चांगलीच फजिती केली. धान नर्सरीच्या पेरणीपासून तर कापणीपर्यंत शेतकऱ्यांचे आर्थिक पात्र रिकामे झाले असले; तरी आत्मविश्वासाने परिस्थितीशी सामना केला आहे. परंतु, आता मात्र, धानाच्या विक्रीसाठी दलालाच्या दावणीला धानाची गाठोडी बांधण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांचाही धुमाकूळ सुरू झाला आहे.
यावर्षी धानाला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. धानाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. व्यापाऱ्यांच्या आणि दलालांच्या बळजबरीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांनी जीवाचे रान करू न धानाची लागवड केली. काहींना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे परिणामी खर्च आर्थिक बळ पुन्हा मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरु आहे. अधिक प्रमाणात धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे दलालांच्या फेरफटका सुरू झाल्या आहेत. यामुळे धान खरेदीसाठी व्यावसायिक वर्गाचे लक्ष लागले आहे. धानाची मळणी होताच व्यापारी धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना निरोप देत आहेत.
यावर्षी धानविक्री सोबतच खरेदी मोठया प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे. काहींनी फायदा तर काहींना तोटा अशी परिस्थिती यावर्षी शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आहे. त्यातही काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे धानावर अयोग्य परिणाम होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा नैसर्गिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतावरच्या फेऱ्या वाढत्या असून, त्याच्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे.
अकाली पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यावर्षी चांगलीच कंबर कसावी लागल्याने आर्थिक बोाजही सहन करावा लागला आहे. मात्र, कर्जफेडीसाठी धानविक्री महत्वाची असून योग्य भावाची आशा शेतकऱ्यांची पदरात आली आहे. (नगर प्रतिनिधी)