चिखलणी करताना ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:10+5:302021-07-20T04:24:10+5:30
संदीप आनंदराव ढोरे (२८) रा. कन्हाळगाव असे मृताचे नाव आहे. सोमवारी मडेघाट येथील बालू राऊत यांच्या शेतात धान रोवणीसाठी ...

चिखलणी करताना ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार
संदीप आनंदराव ढोरे (२८) रा. कन्हाळगाव असे मृताचे नाव आहे. सोमवारी मडेघाट येथील बालू राऊत यांच्या शेतात धान रोवणीसाठी ट्रॅक्टरने चिखलणीचे काम सुरू होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर अचानक चिखलात फसला. चालक संदीपने ट्रॅक्टरच्या मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावेळी नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला. त्यात ट्रॅक्टरखाली चालक संदीप दबल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेतशिवारातील शेतकऱ्यांना होताच अनेकांनी शेतात धाव घेतली. लाखांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस नाईक राऊत, पोलीस अंमलदार मनीष चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टरखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा केला. तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे.