पर्यटकांना ‘जय’, ‘चांदी’ची भुरळ
By Admin | Updated: February 29, 2016 00:21 IST2016-02-29T00:21:39+5:302016-02-29T00:21:39+5:30
नदी, नाले, डोंगर, दऱ्या व शेकडो औषधी वनस्पतीच्या प्रजातीने परिपूर्ण असलेले उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीला उतरत असताना जय, चांदीच्या ओढीने अभयारण्य चर्चेत आहे.

पर्यटकांना ‘जय’, ‘चांदी’ची भुरळ
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य : रोजगाराच्या संधी, वनविभागाच्या महसुलात वाढ
अशोक पारधी पवनी
नदी, नाले, डोंगर, दऱ्या व शेकडो औषधी वनस्पतीच्या प्रजातीने परिपूर्ण असलेले उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीला उतरत असताना जय, चांदीच्या ओढीने अभयारण्य चर्चेत आहे. सोशल मिडीया वर शेअर झालेल्या चित्रफितीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने अभयारण्याकडे धाव घेऊ लागले आहेत.
रविवार तर बुकींग मिळाली नही म्हणून नैराश्य मिळालेल्या पर्यटकांसाठी अभयारण्याऐवजी गोसीखुर्द प्रकल्पस्थळ पर्यटनस्थळी निवडण्याची वेळ अनेकांवर येत आहे. पवनी खापरी प्रवेशद्वारावर सकाळी ६ वाजेपासून पर्यटकांची रिघ लागलेली असते. पर्यटकांच्या सोयीसाठी पवनी येथील निसर्गप्रेमींनी जीप्सी उपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ सुरु केल्यामुळे पुरेशा जिप्सी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे खुल्या जिप्सीमधून घनदाट जंगलाचा मनमुराद आनंद घेण्याचा लाभ पर्यटकांना मिळत आहे.
राजकारणातील व्हीआयपी, प्रसिद्ध क्रिकेटपटू, सिनेकलावंत यांच्या हजेरीमुळे पर्यटकांत जय, चांदीचे आकर्षण वाढलेले आहे. सोबतच त्यांचे दोन बछडे पाहण्याचा योग पर्यटकांना या अभयारण्यात येत आहे. जंगलात मोह, सागवान, खैर, आवळा, बेहडा, भेरा, डिकामाली, बांबू, येन, पळस, टेंभर्णी, गराडी अशा शेकडो प्रजातींचे वृक्ष पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. सोबतच मोर, काळवीट, बिबट, ससे, हरिण, रानगवा व विविध प्रकारचे पक्षी जंगलात पाहावयास मिळत असल्याने पर्यटक वाढले आहेत. प्रकल्पबाधीत क्षेत्रातील युवकांना प्रशिक्षित करून गाईड नियुक्त करण्यात आलेले आहे. पवनी गेटवर प्रतिक्षालय झाले. अन्य सुविधा कराव्या अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.