गोसीखुर्द धरणावर पर्यटकांची मांदियाळी

By Admin | Updated: August 19, 2015 01:02 IST2015-08-19T01:02:33+5:302015-08-19T01:02:33+5:30

पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय गोसेखुर्द धरणाचे सौंदर्य जवळून पाहण्याकरिता रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

Tourist places on the Gosikhurd dam | गोसीखुर्द धरणावर पर्यटकांची मांदियाळी

गोसीखुर्द धरणावर पर्यटकांची मांदियाळी

पर्यटकांचा आकडा लाखावर : मनमोहक दृश्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता
पवनी : पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय गोसेखुर्द धरणाचे सौंदर्य जवळून पाहण्याकरिता रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. पण एकट्या स्वातंत्र्यदिनी जवळपास एक लक्ष पर्यटकांनी भेट देवून धरणाच्या सौंदर्याच्या आठवणी आपल्यासोबत नेल्या.
गोसीखुर्द धरण या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहिले आहे. या धरणाच्या चर्चा राष्ट्रीय पातळीवर गेल्यामुळे या धरणाची राष्ट्रीय पातळीवर माहिती झाली. त्यामुळे विदर्भातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून गोसीखुर्द धरण समोर आले आहे.
गोसीखुर्द धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले घनदाट, विस्तीर्ण जंगल, उंच डोंगरदऱ्या, सभोवताल पसरलेले हिरवेगार रान, त्यातून पाणी खळखळत वाजत निघालेला उजवा कालवा. हे मनमोहक दृष्य पाहून या धरणाला भेट देणाऱ्या पर्यटकांचे मन मोहून जाते. या वर्षी पावसाळ्यात वैनगंगा नदीला आलेले अनेक पूर, त्यामुळे धरणात वाढलेल्या जलस्तरामुळे अनेकवेळा धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे मोठ्या प्रमाणात उघडण्यात येवून त्यातून पाण्याचा मोठा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात आला आहे.
सर्व ३३ वक्रद्वारातून धो-धो करीत निघणारे पांढरे शुभ्र पाण्याचे सौंदर्य पाहण्याची मजा काही वेगळीच. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या संख्येने पर्यटक गोसीखुर्द धरणाला भेट देतात.
स्वातंत्र्यदिनी जवळपास १ लक्ष पर्यटकांनी या धरणाला भेट देवून धरणाच्या आठवणी सोबत नेल्या. याच दिवशी धरणाची २७ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली होती. त्यामुळे धरणाच्या सौंदर्याचा पर्यटकांना अधिकच आनंद घेता आला. दररोज शनिवारी, रविवारी व सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात. लहान मुलांना फिरण्याकरिता घोडाही राहत असल्यामुळे त्यांना मोठी मजा येते. स्वातंत्र्यदिनी गोसीखुर्द धरणासोबतच पर्यटकांनी रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी महास्तूप, ऐतिहासीक किल्ला, अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर या स्थळालाही भेटी देवून त्यांच्या आठवणी मनात साठवून नेल्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tourist places on the Gosikhurd dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.